आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड गेल्या १६ वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरीद्वारे या श्रेणीतील सर्वोत्तम फंडापैकी एक ठरला आहे. समभाग, रोखे आणि डेरिव्हेटिव्हज (हेजिंगसाठी) अशा मिश्रणाद्वारे हा फंड तुलनेने कमी जोखमीवर सातत्याने स्थिर परतावा देण्यास सक्षम ठरला आहे. फंडाने गेल्या १० वर्षांमध्ये ११.९५ टक्के दराने ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर परतावा दिला आहे, जो या श्रेणीत अव्वल ठरला आहे.
बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज ही अशी म्युच्युअल फंड श्रेणी आहे, जिच्याद्वारे महागाईवर मात करेल असा म्हणजेच दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीतील परताव्याच्या तुलनेत किंचित कमी पण जोखीम-संतुलित आणि रोखेसंलग्न गुंतवणुकीपेक्षा सरस परताव्याची अपेक्षा केली जाते. प्राप्त आकडेवारीनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाने १० वर्षांत १३.५ टक्के दराने परतावा दिला आहे.
हेही वाचाः अनिल अंबानींपाठोपाठ आता टीना अंबानींचीही ईडीकडून चौकशी
‘अर्थलाभ’द्वारे संकलित आकडेवारीनुसार, १५ जून २०२३ पर्यंत गत तीन वर्षांत या फंडाने १८ टक्के, तर पाच वर्षांत ११ टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत या श्रेणीचा परतावा अनुक्रमे १४.८ टक्के आणि ८.६ टक्के असा आहे तर ‘क्रिसिल हायब्रिड इंडेक्स’ने १५.६ टक्के आणि ११ टक्के परतावा दिला आहे. मार्च २०२० मध्ये करोना साथी उद्रेक आणि देशव्यापी टाळेबंदीच्या घोषणेनंतर जेव्हा ‘सेन्सेक्स’मध्ये पडझड होत तो २९ हजारांखाली आला तेव्हा या फंडाने पोर्टफोलिओमधील निव्वळ समभाग गुंतवणुकीचे प्रमाण वाढवून ७३.७ टक्क्यांवर नेले.
नोव्हेंबर २०२१ पर्यंत जेव्हा बाजाराने ६० हजाराची पातळी गाठली तेव्हा या फंडाने त्याची निव्वळ समभाग गुंतवणूक ३० टक्क्यांच्या किमानतम पातळीवर आणली होती. मे २०२३ मध्ये त्याचा समभाग गुंतवणुकीचा स्तर ३९.७ टक्के होता. दशकाहून अधिक कालावधीत समभाग आणि रोखेसंलग्न गुंतवणुकीतील संतुलनाचे कार्य या फंडाने चतुराईने सांभाळले आहे, त्याचे प्रतिबिंब फंडाच्या परताव्यात उमटले आहे.