वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महागाईच्या दराने सव्वा वर्षातील उच्चांकी पातळी गाठल्याने पुन्हा एकदा व्याजदर वाढीची टांगती तलवार कायम आहे. यातच आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या दोन सदस्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. खाद्यवस्तूंच्या भावातील वाढीमुळे सार्वजनिक खर्च कमी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असे या सदस्यांनी बँकेला सुचविले आहे.

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे ४ टक्क्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात अधिक २ टक्के आणि उणे २ गृहित धरले जातात. परंतु, ही पातळी ओलांडून मागील महिन्यात महागाईचा दर ७.४४ टक्यांवर पोहोचला. यामागे प्रामुख्याने खाद्यवस्तूंच्या भाववाढीचे कारण होते. कारण किरकोळ किंमत निर्देशांकात निम्मा वाटा खाद्यवस्तूंचा आहे. खाद्यवस्तूंचा पुरवठा कमी झाल्याने त्यांच्या किमतीत ११.५१ टक्के वाढ नोंदविण्यात आली. प्रतिकूल हवामानामुळे कृषी उत्पादनाला फटका बसल्याने पुरवठा कमी होऊन महागाई वाढत आहे.

हेही वाचा – समभाग खरेदी-विक्री व्यवसायात ‘फोनपे’ची उडी, भांडवली बाजारात ‘शेअर डॉट मार्केट’ या नवीन दलाली पेढीची सुरुवात

याबाबत पतधोरण समितीचे सदस्य शशांक भिडे म्हणाले की, खाद्यवस्तूंची महागाई नियंत्रणात आणणे हा कळीचा मुद्दा आहे. देशाअंतर्गत बाजारात पुरेसा पुरवठा होईल याची हमी घेण्याची आवश्यकता आहे. याचरोबर सार्वजनिक सुरक्षा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पुरेसा पाऊस पडलेला नसून, ही चिंतेची बाब आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पन्नावर परिणाम होणार आहे. देशातील सुमारे ६५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यांचे जीवनमान कृषीवर अवलंबून आहे.

पतधोरण समितीचे बाह्य सदस्य जयंत राम वर्मा म्हणाले की, पतधोरण कठोर केल्याचे परिणाम अद्याप दिसून येत आहे. पुढील काही तिमाहींमध्ये महागाईचा दर कमी झालेला दिसेल. असे असले तरी महागाईत होणाऱ्या वाढीबद्दल रिझर्व्ह बँकेने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. अपुऱ्या पावसामुळे मागणी आणि पुरवठाही कमी झाला आहे. ग्रामीण भागातील मागणीवर आगामी महिन्यात लक्ष ठेवावे लागेल.

हेही वाचा – Gold-Silver Price on 31 August 2023: सोने-चांदी महागले; १० ग्रॅमचा दर पाहून फुटेल घाम

मागील मेपासून व्याजदरात अडीच टक्के वाढ

रिझर्व्ह बँकेने मागील वर्षातील मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. मागील तीन पतधोरण आढाव्यांमध्ये व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी महागाई वाढल्यास व्याजदर वाढ केली जाईल, असे संकेतही पतधोरण समितीने चालू महिन्यातील आढावा बैठकीत दिले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beware of rising food inflation warning to reserve bank print eco news ssb