गेल्या काही दिवसांपूर्वीच महिला राजीनामा देत असल्यानं चर्चेत आलेल्या टीसीएस कंपनीमध्ये आता घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. नोकरीच्या बदल्यात लाच मागितल्याची बाब उघडकीस आली आहे. नोकरीशी संबंधित घोटाळे अनेकदा समोर येत असतात, पण आता असे प्रकरण समोर आले आहे, जो बहुधा अशा प्रकारचा पहिलाच नोकरी घोटाळा असावा. या प्रकरणाचे धागेदोरे देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसशी संबंधित आहेत, ज्यामध्ये नोकऱ्या देण्याच्या बदल्यात कोट्यवधींचे कमिशन (TCS Job Scandal) घेण्यात आले आहे.
एका व्हिसलब्लोअरने केला खुलासा
लाइव्ह मिंटच्या एका बातमीनुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठं कमिशन घेतले. हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे.
कंपनीने आतापर्यंत केली अशी कारवाई
तक्रार प्राप्त झाल्यानंतर TCS ने त्याची चौकशी करण्यासाठी तीन उच्च अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन यांचाही समावेश होता. आठवड्याच्या तपासानंतर टीसीएसने चक्रवर्ती यांना रजेवर पाठवले आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. याशिवाय आयटी कंपनीने कर्मचारी भरती करणाऱ्या तीन कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकले आहे. चक्रवर्ती १९९७ पासून TCS मध्ये कार्यरत होते. ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन गणपती सुब्रमण्यम यांना रिपोर्ट करत होते. रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे कार्यकारी अरुण जीके यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांशिवाय ज्या अधिकाऱ्यांवर टीसीएसने कारवाई केली, त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
१०० कोटींच्या कमिशनची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, टीसीएसमध्ये नोकरी मिळवण्याच्या बदल्यात हा भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात झाला हे सांगता येणं सध्या कठीण आहे, परंतु असे मानले जाते की, यातील लोकांनी किमान १०० कोटी रुपये कमिशन घेतले आहेत. खरं तर RMG विभाग दररोज नवीन भरतीसह सुमारे १४०० अभियंत्यांना विविध प्रकल्पांवर नियुक्त करतो. याचा अर्थ TCS चा RMG विभाग दर मिनिटाला नवीन प्लेसमेंट करतो, यावरूनच घोटाळ्याची कल्पना करू शकता.
हेही वाचाः ऑफिसला यायला सांगितल्यामुळे टीसीएसमधल्या महिला सामूहिक राजीनामा देतायत? कंपनीनं दिलं उत्तर
TCS मध्ये ३ वर्षांत ३ लाख भरती
टाटा समूहाची IT कंपनी TCS ही भारतीय कॉर्पोरेट जगतात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देते. २०२२च्या अखेरीस TCS च्या कर्मचाऱ्यांची संख्या ६.१५ लाख होती. गेल्या ३ वर्षांत कंपनीने सुमारे ३ लाख भरती केल्या आहेत आणि यापैकी ५० हजार लोकांना अलीकडच्या काही महिन्यांत नियुक्त करण्यात आले आहे. TCS सह जवळजवळ सर्व मोठ्या आयटी कंपन्या कर्मचारी फर्मद्वारे भरती करतात.