जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. अनेक श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली असतानाच भारतातील बड्या उद्योगपतींच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. जगातील अब्जाधीशांच्या नव्या यादीत कोण कोणत्या क्रमांकावर आहे हे जाणून घेऊयात.
ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सनुसार, गेल्या २४ तासांत टॉप २० मध्ये समाविष्ट १८ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. यामध्ये अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांची एकूण संपत्ती १९.८ अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे १,६३,९०९ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती १३९ अब्ज डॉलर्स इतकी कमी झाली आहे. या क्षणी बेझोस हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बर्नार्ड अर्नॉल्टच्या एकूण संपत्तीत आणखी मोठी घसरण झाली आहे. गेल्या २४ तासांत त्यांची एकूण संपत्ती ११.२ अब्ज डॉलर किंवा सुमारे ९२,००० कोटी रुपयांनी घसरली आहे.
जेफ बेझोसच्या संपत्तीत किती घट?
रिपोर्टनुसार, जेफ बेझोस यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर एंगेजमेंट केली आहे. हे जोडपे २०१८ पासून एकमेकांना डेट करीत आहेत, परंतु संपत्तीत घट झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
अर्नॉल्ट आणि मस्कमधील अंतर कमी होतंय?
संपत्तीतील बदलामुळे बर्नार्ड अर्नॉल्ट आणि इलॉन मस्क यांच्यातील अंतर कमी झाले आहे. मस्कच्या एकूण संपत्तीत २.२२ अब्ज डॉलरची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती १८० अब्ज डॉलर्स आहे. अशा परिस्थितीत अर्नॉल्ट आणि इलॉन मस्क यांच्या संपत्तीत १२ अब्ज डॉलरचे अंतर आहे.
या अब्जाधीशांचेही नुकसान झाले
बिल गेट्सचे १.०२ अब्ज डॉलर, वॉरन बफेचे २.१९ अब्ज डॉलर, लॅरी एलिसनचे २.९० बिलियन डॉलर आणि लॅरी पेजचे १.९५ बिलियन डॉलरचे नुकसान गेल्या २४ तासांत झाले आहे.
गौतम अदाणींनी किती कमाई केली?
जगातील श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली असली तरी भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत गौतम अदाणींची नेट वर्थ ४.३८ बिलियन डॉलरने वाढून ६४.२ बिलियन डॉलर झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५.४९ दशलक्ष डॉलर वाढ झाली आहे. आता त्यांची संपत्ती ८४.१ अब्ज डॉलर आहे. ते जगातील १३ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.