अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कूटचलनाच्या (क्रिप्टो करन्सी) विविध श्रेणींचा उल्लेख करीत, अमेरिकेत त्यांचा राखीव कोश तयार करण्याची शक्यता नव्याने व्यक्त केल्यानंतर सोमवारी सर्वात लोकप्रिय कूटचलन असलेल्या बिटकॉइनमध्ये २० टक्क्यांची तेजी दिसून आली. बरोबरीने अन्य कूटचलनांच्या किमती देखील झपाट्याने वाढताना दिसून आल्या.

समाज माध्यमावरील एका टिप्पणीत ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या जानेवारीच्या कार्यकारी आदेशामुळे बिटकॉइन, इथर, एक्सआरपी, सोलाना आणि कार्डानो यासारख्या कूटचलनांचा राखीव साठा तयार होईल. ट्रम्प यांनी यापूर्वीही असे संकेत दिले असले तरी कूटचलनांचा नावांसह उल्लेख त्यांनी पहिल्यांदाच केला. बिटकॉइन आणि इथर हे या राखीव कोशाच्या केंद्रस्थानी असतील, असे त्यांनी रविवारच्या या टिप्पणीतून स्पष्ट केले.
या टिप्पणीचा परिणाम म्हणून बिटकॉइन जे शुक्रवारी नोव्हेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर रोडावले होते, ते सोमवारच्या सत्रात २० टक्क्यांनी झेप घेताना दिसून आले. ट्रम्प यांनी कूटचलनावरील नियमन शिथिल करण्याच्या आश्वासनांचे पालन न केल्यामुळे जानेवारीच्या मध्यापासून निराश झालेल्या कूटचलन बाजाराच्या भावनेलाही यातून कलाटणी मिळताना दिसून आली.

शुक्रवारच्या सत्रातील ७८,२७३ डॉलर या नीचांकी पातळीपासून, बिटकॉइनने ९१,६०५ डॉलरपर्यंत सोमवारी मुसंडी मारली. इथर देखील शुक्रवारच्या नीचांकी पातळीपासून २० टक्क्यांनी वाढून २,३५१ डॉलरवर पोहोचला. एक्सआरपी आणि सोलाना शुक्रवारच्या नीचांकी पातळीपेक्षा सुमारे ३० टक्के वर होते, तर कार्डानो गेल्या आठवड्याच्या नीचांकी पातळीपेक्षा तब्बल ६० टक्क्यांनी वर उसळला. ट्रम्प यांच्या पुनरागमनाच्या आशावादामुळे जानेवारीच्या सुरुवातीला बिटकॉइनने एक लाख पाच हजार डॉलरचा विक्रमी भाव गाठला होता. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात ट्रम्प यांची या आघाडीवरील निष्क्रियता पाहता फेब्रुवारीमध्ये बिटकॉइन १७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. जून २०२२ नंतरची ही त्याची सर्वात मोठी मासिक टक्केवारीतील घसरण होती.

Story img Loader