वॉशिंग्टन, वृत्तसंस्था
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आभासी चलनाबाबत सकारात्मक पावले उचलली जाण्याच्या आशावादाने सोमवारी सर्वात लोकप्रिय कूटचलन ‘बिटकॉईन’ने विक्रमी उसळी घेतली. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी सोमवारी त्याचे मोल पहिल्यांदाच एक लाख अमेरिकी डॉलर पातळीपुढे गेले.
ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वी बिटकॉईन हा एक गैरव्यवहारासारखा प्रकार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मतपरिवर्तन होऊन त्यांनी कूटचलनाचे समर्थन सुरू केले. नंतर त्यांनी नवीन कूटचलनाचे समारंभपूर्वक अनावरणही केले होते आणि अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात अमेरिकेला जगाची कूटचलन राजधानी बनविण्याची घोषणा त्यांनी केली होती. याचबरोबर कूटचलनाची मोठी राखीव गंगाजळी निर्माण करणे, या उद्योगाला पूरक कायदे बनविणे आणि या उद्योगातील व्यक्तीला प्रशासनात स्थान देणे ही आश्वासनेही त्यांनी दिली होती. यामुळे ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी बिटकॉईनचे मूल्य सोमवारी १ लाख ९ हजार डॉलरवर पोहोचले.
हेही वाचा : कर्जदारांशी तडजोड शेवटचा पर्याय; रिझर्व्ह बँकेचे मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांना सुधारीत निर्देश
बिटकॉईन हे सध्याचे सर्वांत लोकप्रिय कूटचलन असून, त्याची निर्मिती २००९ मध्ये करण्यात आली. कोणतेही सरकार अथवा बँकेचे अशा प्रकारच्या आभासी चलनांवर नियंत्रण नाही. सुरूवातीला वित्तीय क्षेत्रापुरते व्यवहार मर्यादित असलेले आभासी चलन आता मुख्य व्यवहारात आले आहे. हे चलन अस्थिर असून, त्याचा वापर गुन्हेगार, फसवणूक करणारे भामटे आणि युद्धखोर शत्रू देशांकडून अनेक वेळा केला जातो. त्यामुळे या चलनावर सातत्याने टीका केली जाते. तरीही आभासी चलनाचा वापर आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात आभासी चलन उद्योगातील अनेकांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे या मंडळींनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात मोठे आर्थिक योगदान दिले, ज्याची ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यात मदत झाली.
हेही वाचा : बजाज फायनान्सचे कर्ज वितरण आता ‘एअरटेल’कडून
दोन वर्षांत तेजी पाचपट
बिटकॉईनची किंमत दोन वर्षांपूर्वी २० हजार डॉलर होती. आता ती पाच पटीने वाढून १ लाख डॉलरपुढे गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयापासून बिटकॉईनची किंमत सातत्याने वाढत आहे. बिटकॉईने गेल्या महिन्यात प्रथमच १ लाख डॉलरची पातळी गाठली होती. त्यानंतर तो ९० हजार डॉलरपर्यंत खाली आला. सरलेल्या शुक्रवारी (१७ जानेवारी) बिटकॉईन ५ टक्क्यांनी वधारला होता, तर सोमवारी ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी त्याची किंमत ९ हजार डॉलरनी वधारली.