पीटीआय, नवी दिल्ली

अदानी समूहाच्या ७५ कोटी डॉलरच्या रोखे विक्रीत जागतिक गुंतवणूकदार संस्था ब्लॅकरॉकच्या व्यवस्थापनाखालील फंडांनी सर्वाधिक एकतृतीयांश हिश्शाची खरेदी केली.

अमेरिकास्थित ब्लॅकरॉककडून १२ लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरच्या संपत्तीचे व्यवस्थापन केले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या ७५ कोटी डॉलरच्या हिस्सा विक्रीतील एकतृतीयांश हिस्सा ब्लॅकरॉकने घेतला असून, त्याचा मुदत काळ ३ ते ५ वर्षे आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून अदानी समूहाच्या विरोधात लाचखोरी प्रकरणाचा खटला सुरू आहे. याचवेळी ब्लॅकरॉकने ही मोठी गुंतवणूक केली आहे.

भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात या निमित्ताने ब्लॅकरॉकने पहिल्यांदाच गुंतवणूक केली आहे. ब्लॅकरॉकसोबत अन्य पाच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी समूहाकडून भांडवल उभारणीसाठी केलेल्या रोखे विक्रीत प्रामुख्याने अमेरिकी आणि युरोपीय कंपन्या सहभागी झाल्या. त्यात सोना ॲसेट मॅनेजमेंटच्या अंतर्गत व्यवस्थापन होणाऱ्या फंडांचाही समावेश आहे.

अदानी समूहाच्या प्रवर्तकांकडून रिन्यू एक्झिम डीएमसीसी या परदेशातील उपंकपनीच्या माध्यमातून ७५ कोटी डॉलरची रोखे विक्री करण्यात आली. इतर कंपन्यांचे अधिग्रहण आणि विस्तारासाठी कंपनीकडून या निधीचा वापर केला जाणार आहे. अदानी समूहात या निमित्ताने ब्लॅकरॉकची गुंतवणूक झाली आहे. जगातील सर्वांत मोठ्या गुंतवणूकदार संस्थेने गुंतवणुकीने समूहावरील विश्वासार्हता वाढल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.