मुंबईः पर्यटकांना आकर्षित करणारा युरोपातील दुसरा मोठा देश असलेल्या स्पेनमध्ये, शिक्षण तसेच व्यापार-व्यवसायासाठी जाणाऱ्या भारतीयांचा ओढा पाहता चालू आर्थिक वर्षात तेथील व्हिसा अर्जात १० टक्क्यांची वाढ होऊन ती संख्या ६० हजारांवर जाणे अपेक्षित असल्याचे बीएलएस इंटरनॅशनलने गुरुवारी स्पष्ट केले. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच त्यात वार्षिक तुलनेत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

स्पेन सरकारसाठी जागतिक व्हिसा अर्ज प्रक्रियादार म्हणून काम पाहत असलेल्या बीएलएस इंटरनॅशनलच्या नरिमन पॉइंटस्थित ६,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक व्हिसा प्रक्रिया कार्यालयाचे गुरुवारी स्पेनचे मुंबईतील वाणिज्य दूत फर्नांडो नोग्यूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सरलेल्या २०२३-२४ सालात स्पेनच्या सुमारे ५२,००० अल्पमुदतीच्या व्हिसा अर्जांची प्रक्रिया भारतातून बीएलएसद्वारे करण्यात आली. ही संख्या कोविड-पूर्व पातळीच्या तुलनेत ४० टक्के अधिक असल्याचे फर्नांडो नोग्यूर म्हणाले. बॉलीवूड निर्मात्यांचा चित्रीकरणासाठी स्पेनच्या रमणीय ठिकाणांकडे वाढलेला कल पाहता, तसेच नोकरीपेशा, व्यवसाय, शिक्षणानिमित्त स्पेनमध्ये दीर्घ काळासाठी राहणाऱ्या व्हिसा अर्जांची प्रक्रियाही आता खुली झाल्याने यंदा व्हिसासाठी अर्जात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. बीएलएल इंटरनॅशनलच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयातून स्पेनव्यतिरिक्त, स्लोव्हाकिया, इजिप्त, गांबिया, मोरोक्को आणि दक्षिण कोरियाच्या व्हिसा अर्जही हाताळले जाणार आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bls predicts a 10 percent increase in spain visa applications print eco news amy
First published on: 21-06-2024 at 08:35 IST