मुंबईः जर्मनीचा आलिशान मोटारींच्या निर्मात्या असलेल्या बीएमडब्ल्यू समूहाने, जानेवारी-सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यांत बीएमडब्ल्यू व मिनीच्या विक्रीत वार्षिक तुलनेत १० टक्क्यांची वाढ साधून, एकूण १०,५५६ अशी आजवरची सर्वाधिक वाहने विकल्याचे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये याच नऊ महिन्यांत विक्री झालेल्या बीएमडब्लू आणि मिनी मोटारींची संख्या ९,५८० इतकी होती. शिवाय, समूहाने यंदाच्या नऊमाहीत मोटरॅड नाममुद्रेच्या ५,६३८ मोटारसायकलींची विक्रीही केली आहे. बीएमडब्ल्यू एम सीएस ही आलिशान कारचे बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पावा यांनी अनावरण केले. चालू वर्षात भारतात दाखल झालेले हे समूहाचे २५ वे नवीन मॉडेल आहे.
हेही वाचा >>> कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने सप्टेंबरमध्ये शाकाहार महागला!
वर्ष २००७ मध्ये भारतात प्रवेश केलेल्या बीएमडब्ल्यू समूहामध्ये सध्या, बीएमडब्ल्यू, मिनी आणि दुचाकींमध्ये मोटरॅड या तीन नाममुद्रांअंतर्गत वाहने विकली जात आहेत. यशस्वी बाजारपेठलक्ष्यी धोरण, अतुलनीय ग्राहक अनुभव व विश्वास यांच्या मिलाफातून ही दमदार कामगिरी शक्य झाले, असे मत विक्रम पावा यांनी व्यक्त केले. महागड्या किमतीपेक्षा जागतिक नाममुद्रेच्या आलिशान मोटारींबाबत देशांत ग्राहकांच्या वाढलेला ओढाही यामागे आहे.
विशेषतः बीएमडब्ल्यू ७ आणि ५ सिरीज लाँग व्हीलबेस प्रकारातील वाहनांना मागणी मोठी असून, बीएमडब्ल्यू एक्स१ सारखी प्रमुख मॉडेल्स त्यांच्या विभागामध्ये आघाडीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीएमडब्ल्यूने विद्युत शक्तीवरील अर्थात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान कायम राखले असून, २०२४ मध्ये सप्टेंबरपर्यंत नऊ महिन्यांत एकंदर ७२५ पूर्णतः इलेक्ट्रिक बीएमडब्ल्यू आणि मिनी कार खरेदीदारांना वितरित केल्या गेल्या आहेत, असे पावा यांनी सांगितले.