मुंबई : राज्याच्या सहकार क्षेत्रातील अव्वल १० बँकांमध्ये स्थान असलेल्या मुंबईस्थित अभ्युदय सहकारी बँकेच्या प्रशासन आणि कारभारातील त्रुटींवर बोट ठेवत रिझर्व्ह बँकेने तिचे संचालक मंडळ शुक्रवारी बरखास्त केले. पुढील १२ महिन्यांसाठी बँकेचा कारभार पाहण्यासाठी स्टेट बँकचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशासन मानकांबाबत हयगयीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे निरीक्षण करता ही कारवाई करणे आवश्यक ठरले, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असले तरीही बँकेवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत आणि मध्यवर्ती बँकेच्या नियुक्त प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व बँकिंग व्यवहार सुरळितपणे सुरू राहणार असल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

हेही वाचा : वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे ‘पेटीएम’मधून बाहेर

रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेले प्रशासक सत्यप्रकाश पाठक यांना मदत करण्यासाठी सल्लागारांची एक समितीही नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सनदी लेखापाल महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, अभ्युदय सहकारी बँकेचे कर्जवाटप तसेच लाभांश वाटपासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने मर्यादा घातल्या होत्या. पुढचे पाऊल म्हणून १२ महिन्यांपर्यंत प्रशासक कामकाज सांभाळणार असून तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मात्र रिझर्व्ह बँकेला आवश्यकता असल्यास हे निर्बंध पाच वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकतात, असे ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

हेही वाचा : सुझुकीच्या ‘मारुती’मधील हिस्सेदारीत वाढ

नफ्यात घसरण, बुडीत कर्जात वाढ

हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या अभ्युदय बँकेने मार्च २०२१ अखेर १७,५०० कोटींचा एकत्रित व्यवसाय आणि ३.५५ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. आधीच्या वर्षातील १६.२२ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत त्यात लक्षणीय घसरण दिसून आली. नफ्याची कामगिरी नसल्यामुळे २०२०-२१ पासून बँकेने भागधारकांना लाभांश वाटपही केलेले नाही. अभ्युदय बँकेच्या संकेतस्थळावर, ३१ मार्च २०२० पर्यंतच्या आर्थिक कामगिरी प्रदर्शित करण्यात आली असून, नंतरच्या दोन आर्थिक वर्षातील कामगिरी नमूद करण्यात आलेली नाही. तथापि, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या ढोबळ बुडीत कर्जाचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण १९ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर आणि नक्त अनुत्पादित मालमत्ता (नेट एनपीए) प्रमाण देखील ११ टक्क्यांवर पोहोचले आहे. बँकेकडे १७ लाख ३० हजारांहून अधिक ठेवीदार असून, त्यांच्या एकूण ठेवी १०,८३८ कोटी रुपये इतक्या आहेत आणि ६,६५४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण बँकेकडून करण्यात आले आहे. बँकेची आर्थिक वर्ष २०२०-२१ नंतरची वित्तीय स्थिती स्पष्ट करणारी आकडेवारी जाहीररित्या उपलब्ध नाही.

सर्व व्यवहार सुरळीत…

संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असले तरीही बँकेवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत आणि मध्यवर्ती बँकेच्या नियुक्त प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व बँकिंग व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

हेही वाचा : रश्मिका मंदाना आणि कतरिना कैफनंतर आता रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल

‘खातेदारांनी भीती बाळगू नये’

बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत रिझर्व्ह बँकेने कोणताही इशारा दिलेला नाही. बँकेच्या सर्व शाखांचे सर्व प्रकारचे कामकाज नित्यनेमाने सुरू राहणार आहे. त्यामुळे खातेदारांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. केवळ दैनंदिन परिस्थितीवर प्रशासकांच्या नियुक्तीमुळे मध्यवर्ती बँकेचे थेट नियंत्रण राहिल आणि तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीमुळे बँकेचा कारभार अधिक सक्षम होईल, असे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रेमनाथ सालियन यांनी सांगितले.

“रिझर्व्ह बँकेला आवश्यकता असल्यास हे निर्बंध पाच वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकतात. मात्र यातून बँकेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, तर व्यवहार नियमितपणे सुरू राहतील. उलट मध्यवर्ती बँकेने प्रशासकाची नेमणूक केल्याने बँकेच्या कामकाजात अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे.” – विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board of directors of abhyudaya bank dissolved rbi appoints administrator for one year print eco news css