बेंगळुरू, पीटीआय
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बीपीएल समूहाचे संस्थापक टी. पी. गोपालन नांबियार यांचे गुरुवारी प्रदीर्घ काळ सुरू राहिलेल्या प्रकृती अस्वास्थ्यातून गुरुवारी सकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले, अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे टीपीजी हे सासरे आहेत.

ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ८० आणि ९० च्या दशकातील अग्रगण्य कंपनी असलेल्या बीपीएलची नांबियार यांनी १९६३ मध्ये ‘लायसन्स राज’ दरम्यान स्थापना केली. कंपनीने सुरुवातीला भारतीय संरक्षण दलांसाठी हर्मेटिकली सीलबंद अचूक पॅनेल मीटर तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पलक्कड, केरळ येथे बीपीएलची पहिली उत्पादन सुविधा सुरू झाली, परंतु नंतर बेंगळुरू येथे प्रकल्प स्थलांतरित करण्यात आला.

हेही वाचा : Diwali Gold Silver Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नांबियार यांच्या नेतृत्वाखाली, बीपीएलने रंगीत टीव्ही संच, फ्रिज, वॉशिंग मशिन, व्हिडिओ कॅसेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह उत्पादन श्रेणी वाढवत नेली. १९९० च्या दशकात भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील ती एक महाकाय कंपनी बनली. मात्र, १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणानंतर कंपनीला दक्षिण कोरियाच्या एलजी आणि सॅमसंग या कंपन्यांकडून वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागला. याबरोबरच कुटुंबातील अंतर्गत वादांमुळे कंपनीच्या घसरणीला हातभार लागला. आव्हाने असूनही, नांबियार यांचा वारसा कायम आहे. त्यांनी भारतातील सर्वात विश्वासार्ह ग्राहक नाममुद्रा बनवली, जी आजही लोकप्रिय आहे. त्यांचे पुत्र अजित नांबियार हे सध्या भांडवली बाजारात सूचिबद्ध बीपीएलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.