पीटीआय, नवी दिल्ली
भारत, ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटना अर्थात ‘ब्रिक्स’चा जागतिक व्यापारात वाटा झपाट्याने वाढत आहे आणि २०२६ पर्यंत तो जगातील विकसित देशांच्या ‘जी ७’ गटाला मागे टाकेल अशी अपेक्षा आहे, असे ईवाय इंडियाच्या ‘इकॉनॉमी वॉच’च्या नवीनतम आवृत्तीने गुरुवारी दावा केला.
जागतिक व्यापारी मालाच्या निर्यातीमध्ये ‘ब्रिक्स’चा वाटा वर्ष २००० मधील १०.७ टक्क्यांवरून २०२३ मध्ये २३.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तीन वर्षांतील ही वाढ १२.६ टक्क्यांची आहे. दुसरीकडे, जागतिक निर्यातीतील ‘जी ७’ गटाचा वाटा याच कालावधीत ४५.१ टक्क्यांवरून, तब्बल १६.२ टक्क्यांनी घटून २८.९ टक्क्यांवर उतरला आहे. उर्वरित जगाचा वाटा या कालावधीत ४४.२ टक्क्यांवरून ४७.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ ‘ब्रिक्स’ने जागतिक व्यापारी मालाच्या निर्यातीत आघाडी घेतली आहे.
हेही वाचा : Diwali Gold Silver Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
दुसरीकडे आयातीमध्येदेखील वाढ झाली आहे. ‘ब्रिक्स’चा वाटा २००० मधील ७.२ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १८.९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्या तुलनेत ‘जी ७’ची आयात याच कालावधीत ४९.८ टक्क्यांवरून ३३.७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तर उर्वरित जगाचा वाटा ४३ टक्क्यांवरून ४७.७ टक्के असा माफक वाढला आहे.
हेही वाचा : एनएसई’कडून २० कोटी ग्राहक संख्येचा टप्पा
चीन-भारताचे वाढते योगदान
‘ब्रिक्स’मध्ये सहभागी देशांचे महत्त्व अर्थव्यवस्थांचे आकारमान आणि जागतिक निर्यात-आयातीतील वाटा या दृष्टीने उत्तरोत्तर वाढत आहे. सध्याच्या भू-राजकीय तणावाच्या संदर्भात, ब्रिक्स देशांमध्ये समन्वय साधण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहेत. शिवाय जागतिक पातळीवर डॉलरचे वर्चस्व कमी करून ‘स्विफ्ट’ या जागतिक व्यापार व्यासपीठावरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश आहे. ब्रिक्सच्या केंद्रस्थानी भारत आणि चीन हे आघाडीचे दोन प्रमुख सदस्य आहेत. २०२३ मध्ये, क्रयशक्तीच्या बाबतीत ते जागतिक स्तरावर अनुक्रमे तिसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर आहेत. दोन्ही देश २०३० पर्यंत हे स्थान कायम ठेवण्याचा अंदाज आहे. ब्रिक्समधील चीनचे योगदान मोठ्या प्रमाणावर वाढले असून २००० मधील ३६.१ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ते ६२.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. भारतानेही लक्षणीय प्रगती साधली असून ब्रिक्सच्या निर्यातीत ७.९ टक्के योगदान दिले आहे.