पुणे : रांजणगावमधील चीझ उत्पादन प्रकल्प सुरू करीत असल्याची घोषणा ब्रिटानिया कंपनीने बुधवारी केली. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बेल ग्रुप यांनी ब्रिटानिया बेल फूड्स या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून यासाठी सुमारे २२० कोटींची गुंतवणूक केली आहे. याबाबत ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वरूण बेरी म्हणाले की, या प्रकल्पातून चेडार आणि मोझेरेला यासारख्या नैसर्गिक चीझ प्रकारांचे दरवर्षी सुमारे सहा हजार टन आणि प्रक्रिया केलेल्या चीझचे सुमारे १० हजार टन उत्पादन दरवर्षी घेतले जाईल.

हेही वाचा : RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

पुणे परिसरातील तीन हजारहून अधिक दूध व्यावसायिकांकडून या कारखान्याला दररोज चार लाख लिटर गाईचे दूध पुरवले जाते. प्रकल्पाच्या १०० किलोमीटर परिघातील पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील ७० गावांत ब्रिटानियाने गेल्या काही वर्षांत बल्क मिल्क कुलर्स बसवून दूध खरेदी आणि संकलन प्रक्रिया सुलभ आहे. दूध घेताना ३१ पातळ्यांवर दूधाचा दर्जा तपासला जातो. यावेळी बेल ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सेसिल बेलिओट, ब्रिटानिया बेल फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिन्हा आदी उपस्थित होते.