Share Market roundup: रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरासंबंधी निर्णयाचा दिवस जसा जवळ येत आहे तसा शेअर बाजारात सावधगिरीचा कल वाढत असून, गुरुवारी (६ फेब्रुवारी) विशेषत: व्याजदराबाबत संवेदनशील ऑटो, बँका आणि ग्राहक उपभोग क्षेत्रातील ट्रेन्ट, टायटन, आयटीसी, भारती एअरटेल या शेअर्समधील घसरणीचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीच्या नुकसानीत प्रमुख वाटा राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायद्यांच्या साप्ताहिक करारांच्या समाप्तीच्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहारही मंदावल्याचे दिसून आले. परिणामी अरुंद पट्ट्यातील व्यवहारानंतर, बीएसई सेन्सेक्स २१३ अंशांनी (०.२७%) घसरून ७८,०५८.१६ वर स्थिरावला. निफ्टी निर्देशांक ९२.९५ अंशांनी (०.३९%) घसरून २३,६०३.३५ वर बंद झाला. बुधवारच्या घसरणीनंतर, आज (गुरुवारी) ०.३ टक्क्यांच्या वाढीसह निर्देशांकांनी सकारात्मक सुरुवात केली होती. जवळपास चार वर्षे उच्च पातळीवर राहिलेल्या व्याजदरात रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षित कपात केली जाईल, हे शेअर बाजाराने गृहितच धरले आहे. मात्र कपातीचा हा निर्णय टिकाऊ असेल, म्हणजे आगामी काळातही व्याजदरात कपातीच्या चक्राची ती सुरुवात असेल, असा ठोस संकेत रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा हे त्यांच्या पहिल्या पतधोरण आढाव्याच्या बैठकीनंतर देतील काय, याबद्दल बाजारात आता उत्सुकता आहे.

शेअर बाजाराला निर्णायक तेजीचे वळण देईल, अशा धडाकेबाज उपायांची गव्हर्नर मल्होत्रा यांच्याकडून गुंतवणूकदारांच्या आशा वाढल्या आहेत. म्हणून या महत्त्वाच्या घडामोडीपूर्वी त्यांनी तटस्थ वळण घेतले. किंबहुना या संबंधाने साशंकतेमुळे व्याजदर कपातीचे थेट लाभार्थी ठरणाऱ्या वित्तीय क्षेत्रांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीने सुमारे १% घसरण दिसून आली, ऑटो आणि ग्राहक उपभोगाशी निगडित शेअर्स हे २.२% घसरले.

जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करण्याचा निर्णय खरेच घेतला तर त्यातून गुंतवणूकदार आनंदी निश्चितच होतील. कारण यामुळे आर्थिक विकासाला अत्यंत आवश्यक असलेली चालना मिळू शकेल, असे सॅम्को म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी उमेश कुमार मेहता म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पात ग्राहक उपभोगाला चालना देण्यासाठी वैयक्तिक प्राप्तिकर दर कमी करणाऱ्या पावलानंतर, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत व्याजदर कपात व्हावी, असे अपवादानेच घडले आहे. त्यामुळे शेअर बाजारासाठी हा आनंद दुणावणारा क्षण नक्कीच असेल.

शेअर बाजाराची चिंता काय?

व्याजदर कपातीमुळे भारतीय चलन अर्थात रुपयाचे नुकसान होऊ शकते अशी गुंतवणूकदारांमध्ये साशंकता आहे. परकीय गुंतवणूकदारांनी बाहेरचा रस्ता धरण्याचा वेग यातून आणखी वाढेल, या चिंतेचाही शेअर बाजारावर ताण वाढत आहे. रुपयाने गेल्या दोन दिवसात सलग सार्वकालिक नीचांकी घेतलेली बुडी बाजारातील शंकेला बळ देणारी आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) २०२५ च्या प्रारंभापासून आतापर्यंत ९.२३ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ८१ हजार कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकून बाहेर पडले आहेत.

घसरणीचा फटका कुणाला?

शेअर बाजारात आघाडीच्या लार्जकॅपसह, मधल्या व तळच्या फळीतील समभाग सर्वांनाच गुरुवारी विक्रीचा फटका बसला. स्थानिक पातळीवर व्यवसाय केंद्रित असलेल्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांत त्यामुळे अनुक्रमे ०.३% आणि १.३% अशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात वाढणारे शेअर्स १,८७१ तर घसरण दर्शवणाऱ्या शेअर्सची संख्या १,९०७ अशी जवळपास सारखीच होती.
टाटा समूहातील ट्रेन्ट लिमिटेड जवळपास ८% आपटला. तिसऱ्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात तोटा नोंदवणारा स्विगीचा शेअर ७% आपटीने विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. शहरी मागणीतील मंदीमुळे सुला विनेयार्ड्सने डिसेंबर-तिमाहीच्या नफ्यात ३५% घट नोंदवल्यानंतर, तिच्या शेअरमध्ये ४.२% ने घसरण झाली.

दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वितरक रेडिंग्टनचा तिमाही नफा वाढल्यानंतर, तिचा शेअर ६.४% वाढला. सशक्त नफ्याच्या कामगिरीमुळे व्हीआरएल लॉजिस्टिक्स १४% झेप घेताना दिसून आला.