मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून झालेली पाव टक्क्यांची व्याजदर वाढ आणि देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी निर्देशांकातील वजनदार कंपन्यांच्या समभागात विक्री केल्यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४०० अंशांहून अधिक घसरण झाली. सेन्सेक्समधील एचडीएफसी बँक, महिंद्र अँड महिंद्र, नेस्ले आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या समभागात विक्रीचा मारा झाल्याने निर्देशांकातील घसरण वाढली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२५ अंशांहून अधिक वाढीसह उघडल्यानंतर दिवसअखेर तो ४४०.३८ अंशांच्या घसरणीसह ६६,२६६.८२ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११८.४० अंशांची घसरण झाली आणि तो १९,६५९.९० पातळीवर स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ६.३९ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ टेक महिंद्र, नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे, सन फार्मा, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिसचे समभाग प्रत्येकी २.१० टक्क्यांपर्यंत तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात ९२२.८४ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हच्या व्याजदरातील वाढ, ज्यामुळे जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत मिळाले, मात्र देशांतर्गत बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. विशेषतः बँकिंग आणि वाहन निर्माता कंपन्यांच्या समभागांच्या मोठी घसरण झाली. बाजाराच्या अपेक्षेनुरूप फेडने व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ केली. अमेरिकेतील मंदीची शक्यता कमी झाल्याने सकारात्मक भावना अधिक प्रबळ झाली. – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस
बाजार आकडेवारी
सेन्सेक्स ६६,२६६.८२ – ४४०.३८ (-०.६६ टक्के )
निफ्टी १९,६५९.९० -११८.४० (-०.६० टक्के )
डॉलर ८१.९४ -७ पैसे
तेल ८३.७१ +०.९५