मुंबई: आघाडीचा बाजार मंच असलेल्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई लिमिटेड भागधारकांना बक्षीस (बोनस) समभाग देण्याची योजना आखत असून, येत्या रविवारी ३० मार्चला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे, असे बीएसईने राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईला कळवले आहे.
येत्या ३० मार्चला कंपनीकडून बक्षीस समभागाचे प्रमाण आणि पात्रतेसाठी खातेनोंद (रेकॉर्ड) तारीख निश्चित करण्यात येईल. बीएसईकडून भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची ही गेल्या तीन वर्षातील दुसरी वेळ असेल. मार्च २०२२ मध्ये बीएसईने २:१ समभाग म्हणजेच धारण केलेल्या प्रत्येक एका समभागामागे दोन बक्षीस समभाग भागधारकांना दिले आहेत. समभागाची कामगिरी कशी? बक्षीस समभागाच्या वृत्तानंतर गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा समभाग ४.६९ टक्क्यांनी म्हणजेच २०९.६५ रुपयांनी वधारून ४,६८४.३५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, बीएसईचे ६३,४१५ कोटींचे बाजार भांडवल आहे. गेल्या वर्षभरात समभाग १०३ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. तर गेल्या आठवड्यात समभागाने ७.९१ टक्क्यांची कमाई केली आहे.