वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विद्यमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. वर्ष २००७ नंतरचा तिचा पहिलाच नफा आहे. नेटवर्क विस्तार आणि खर्च कमी करण्यासाठी केलेले उपाय आणि ग्राहकांची संख्या वाढल्याने कंपनीने तब्बल १७ वर्षांच्या कालावधीनंतर तिमाही नफा नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरलेल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी समाधानकारक असून, नवोपक्रम, ग्राहकांचे समाधान आणि आक्रमक नेटवर्क विस्तारावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांमुळे, विद्यमान आर्थिक वर्षाअखेरीस महसुलात २० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी म्हणाले. ‘बीएसएनएल’ने डिसेंबर तिमाहीत नोंदवलेला २६२ कोटी रुपयांचा हा नफा बीएसएनएलच्या पुनरुत्थान आणि दीर्घकालीन शाश्वततेबाबत ग्वाही देतो, असे रवी म्हणाले. बीएसएनएलने त्यांचा एकूण खर्च देखील कमी केला आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा १,८०० कोटी रुपयांनी कमी झाला आहे. विद्यमान महिन्याच्या सुरुवातीला, केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) ४जी नेटवर्क विस्ताराला गती देण्यासाठी सुमारे ६,००० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले आहे.