BSNL Loss: भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी नुकतेच स्पष्ट केलेकी, मे २०१४ पासून दहा वर्षांसाठी रिलायन्स जिओला बिल देण्यात सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल अपयश आल्यामुळे केंद्र सरकारला १,७५७.५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बीएसएनएल आणि रिलायन्स जिओ यांच्यात निष्क्रिय पायाभूत सुविधांच्या वापराबाबत करार असूनही, बीएसएनएल तो अंमलात आणण्यात अयशस्वी ठरली आणि जिओ वापरत असलेल्या पायाभूत सुविधांची कोणतीही वसुली केली नाही.

एका निवेदनात, कॅगने म्हटले आहे की, दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादारांना देण्यात येणाऱ्या महसूल वाट्यातून परवाना शुल्काचा काही भाग वजा करण्यात अयशस्वी झाल्यामुळे बीएसएनएल ला ३८.३६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कॅगच्या मते, “बीएसएनएल मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड) सोबत मास्टर सर्व्हिस करार लागू करण्यात अयशस्वी ठरली. याचबरोबर बीएसएनएलच्या सामायिक निष्क्रिय पायाभूत सुविधांवर वापरल्या जाणाऱ्या अतिरिक्त तंत्रज्ञानासाठी बिल दिले नाही, ज्यामुळे मे २०१४ ते मार्च २०२४ दरम्यान सरकारला १,७५७.७६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि त्यावर दंडात्मक व्याज देखील भरावे लागले.”

कॅगच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “बीएसएनएलने रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडसोबतच्या एमएसएमध्ये घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन न केल्यामुळे, पायाभूत सुविधांच्या वापराच्या शुल्कामुळे २९ कोटी रुपयांचा (जीएसटीसह) महसूल तोटा झाला.”

डिसेंबर महिन्यासाठी ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात जिओचे सर्वाधिक ४६.५१ कोटी युजर्स आहेत. यानंतर एअरटेलचा क्रमांक लागतो. त्यांचे देशभरात ३८.५३ कोटी युजर्स आहेत. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्होडाफोन आयडियाचे २०.७२ कोटी आणि बीएसएनएलचे ९.१७ कोटी युजर्स आहेत.

गेल्या महिन्यात, रिलायन्स जिओने एलोन मस्क यांची कंपनी स्टारलिंकसोबत सॅटेलाइट इंटरनेट पुरवण्यासाठी करार केला आहे. स्टारलिंक १०० हून अधिक देशांमध्ये उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा प्रदान करते. त्यांच्याकडे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ७ हजारांहून अधिक उपग्रहांचे सर्वात मोठे उपग्रह नेटवर्क आहे. स्टारलिंक इंटरनेटद्वारे स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ कॉल करता येतात.