सरकारी मालकीच्या बीएसएनएल कंपनीला अखेर ४ जी सेवा सुरू करण्यास मुहूर्त गवसला असून, येत्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्रीय स्तरावर ४ जी सेवा सुरू करणार असणार असल्याचे कंपनीने सोमवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणांतर्गत कंपनीकडून स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
हेही वाचा >>> झी मीडियाच्या मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी
दूरसंचार क्षेत्रात स्पर्धक खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी ५ जी तंत्रज्ञानावर आधारीत सेवा करून दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर, सरकारी मालकीची बीएसएनएलकडून आता ४ जी-समर्थ सेवा अनावरण होऊ घातले आहे. बीएसएनएलने पंजाबमध्ये राबवलेल्या पथदर्शी प्रकल्पात ४ जी सेवेचा ४० ते ४६ मेगाबाइट प्रतिसेकंद वेग नोंदविला आहे. ही सेवा ७०० मेगाहर्ट्झच्या प्रिमियम स्पेक्ट्रम बँडवर सुरू करण्यात येत आहे. पथदर्शी प्रकल्पात २१०० मेगाहर्ट्झ बँडचे स्पेक्ट्रम वापरण्यात आले. सुरूवातीला पंजाबमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. टीसीएस आणि सरकारी मालकीची सी-डॉट दूरसंचार संशोधन संस्थेच्या नेतृत्वाखालील गटाने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला ८ लाख ग्राहकांना ही सेवा देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> विकासदर २०२५ मध्ये ७.१ टक्क्यांवर! इंडिया रेटिंग्जच्या सुधारीत अंदाजात ६० आधारबिंदूंनी वाढ
वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-डॉटने विकसित केलेली ४ जी यंत्रणा पंजाबमध्ये चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ती सुरू करण्यात आली. ही गुंतागुंतीची यंत्रणा यशस्वीपणे काम करीत आहे की नाही हे तपासण्यासाठी १२ महिने लागतात. मात्र, सी-डॉटची यंत्रणा १० महिन्यांतच सुरळीतपणे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बीएसएनएल आत्मनिर्भर ४ जी तंत्रज्ञान देशभरात लवकरच सुरू करेल, असे ते म्हणाले.