लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दिग्गज कंपन्यांमध्ये परदेशी निधीच्या नव्याने प्रवाहामुळे झालेली जोरदार वाढीच्या परिणामी बुधवारच्या सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद आले. मात्र अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढाव्याआधी माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे दिसून आले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४७.७९ अंशांनी वधारून ७५,४४९.०५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने २६७.१२ अंशांची कमाई करत ७५,५६८.३८ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७३.३० अंशांची वाढ झाली आणि तो २२,९०७.६० पातळीवर बंद झाला. देशांतर्गत आघाडीवर बाजाराने सकारात्मक गती कायम राखली आहे. ताजी दिलासादायी तेजी टिकाऊ असेल काय हे अर्थव्यवस्थेच्या मूलभूत घटकांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. केंद्र सरकारने पोलाद आयातीवर कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर धातूशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. परराष्ट्र व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता आणि अर्थव्यवस्था वाढीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, व्याजदरांवरील संकेत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी ‘फेड’च्या पतधोरणाकडे आणि भाष्याकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, झोमॅटो, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटीसी, इन्फोसिस, सन फार्मा, मारुती, एचसीएल टेक आणि नेस्लेच्या समभागात घसरण झाली.
तेजीचा प्रवाह तात्पुरता की टिकाऊ?
बहुतांश समभाग अतिविक्रीच्या क्षेत्रात असल्याने ताजा तेजीचा प्रवाह हा अधिकाधिक तांत्रिक स्वरूपाचा आहे. डेरिव्हेटिव्ह सौद्यांतील प्रलंबित स्थितीतील बदलांवरून असे दिसून येते. विशेषतः महिनाभराच्या अथक विक्रीनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या प्रमाणात शॉर्ट-कव्हरिंगचा परिणाम म्हणून निर्देशांकात ताजी उसळी दिसून येत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.