नवी दिल्ली : भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी त्यांच्यावर काँग्रेसने केलेल्या गैरप्रकार आणि हितसंबंधांच्या संघर्षाच्या आरोपांबाबत पाळलेले मौन सोडून त्यासंबंधाने शुक्रवारी संयुक्तपणे प्रत्युत्तर देणारा खुलासा केला. सर्व आरोप चुकीचे आणि बदनामीच्या हेतूने प्रेरित असल्याचे म्हणत त्यांनी फेटाळून लावले. शिवाय कायदेशीर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुच दाम्पत्याशी निगडित सल्लागार कंपनी ‘अॅगोरा अॅडव्हायझरी’प्रकरणी मुख्यत्वे काँग्रेस पक्षाकडून आरोप करण्यात आले आहेत. महिंद्र समूहाची बाजारपेठ नियम उल्लंघनप्रकरणी चौकशी सुरू असताना धवल बुच यांनी या समूहाकडून ४.७८ कोटी रुपये मिळविले होते. हा हितसंबंधांचा संघर्षच ठरतो अशा आरोपावर बुच यांनी निवेदन दिले आहे. बुच दाम्पत्याने आरोपांचे खंडन करणारे हे निवेदन वैयक्तिक क्षमतेत केले असल्याचीही पुस्ती जोडली आहे.

हेही वाचा >>> छोट्या व्यवसायांवर केंद्रित ‘व्हॉट्सॲप’ची विशेष मोहीम

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘काँग्रेसने केलेले आरोप हे आमच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या आधारे करण्यात आले आहेत. मी ही सर्व माहिती आधीच जाहीर केलेली असून, करही भरलेला आहे. आमची प्राप्तिकर विवरणपत्रे चुकीच्या आणि बेकायदा मार्गाने मिळविण्यात आली. हा केवळ खासगीपणाच्या हक्काचा भंग नसून प्राप्तिकर कायद्याचेही उल्लंघन यातून करण्यात आले आहे.’

माधवी पुरी बुच या ‘सेबी’मध्ये कार्यरत झाल्यापासून अॅगोरा अॅडव्हायजरी, अॅगोरा पार्टनर्स, महिंद्र समूह, पिडिलाइट, डॉ. रेड्डीज, अल्वारेज अँड मरसाल, सेम्बकॉर्प, विसू लिजिंग अथवा आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या कोणत्याही प्रकरणांशी त्यांचा कधीही संबंध आलेला नाही. आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामीकारक आहेत. माधवी यांनी सेबीच्या सर्व प्रकटन (डिस्क्लोजर) आणि फारकत-माघारी (रिक्यूजल) संबंधाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. खरे तर आवश्यकतांपेक्षा जास्त आणि सक्रियपणे माधवी यांनी सेबीकडे ‘रिक्यूजल सूची’ वेळोवेळी दाखल केली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.