ऑनलाइन शिकवणी क्षेत्रातील आघाडीची कंपनी बायजूवरील आर्थिक संकटाचे ढग उत्तरोत्तर गडद बनत असून, कंपनीने गुंतवणूकदारांना तगवून धरण्यासाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ चे प्रलंबित असलेले लेखापरीक्षण सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन सोमवारी दिले. याचबरोबर मार्च २०२३ अखेर समाप्त आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणही डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी कंपनीने ग्वाही दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बायजूचे मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी कंपनीच्या प्रमुख भागधारकांशी शनिवारी (२४ जुलै) दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी भूतकाळातील चुका कबूल करून भविष्यात चुकीचे पाऊल न उचलण्याची हमी त्यांना दिली. कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचीही त्यांनी कबुली दिली. कंपनीने हे राजीनामे अद्याप स्वीकारलेले नसून, त्याआधीच ही माहिती बाहेर आली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संवादावेळी बायजू यांनी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी अजय गोयल यांची भागधारकांशी ओळख करवून दिली. त्या बैठकीत सहभागी एका भागधारकानेच दिलेल्या माहितीप्रमाणे, गोयल यांनीच कंपनीचे २०२१-२२ आणि २०२२-२३ मधील लेखापरीक्षण अनुक्रमे सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे जाहीर केले. याबाबत कंपनीशी संपर्क साधला असता, कोणत्याही मुद्द्याला अधिकृतपणे प्रतिसाद मिळू शकला नाही.
हेही वाचाः ‘एस ॲण्ड पी’कडून सहा टक्क्यांच्या विकासदराचा अंदाज कायम
कंपनीवरील आर्थिक संकट आणखी गडद होऊ लागल्याने संचालक मंडळातील तीन सदस्यांनीही राजीनामा दिला आहे. त्या जोडीला अमेरिकेतील न्यायालयीन लढ्याचे आव्हान कंपनीपुढे आहे. आर्थिक लेखे आणि ताळेबंद राखण्यात दिरंगाईचे कारण पुढे करीत डेलॉईट या लेखापरीक्षण संस्थेने बायजूच्या लेखापरीक्षकाच्या भूमिकेतून तडकाफडकी माघारीचा निर्णय घेऊन कंपनीच्या कोंडीत भर घातली आहे.
कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’चे पैसेही थकीत
बायजूकडून माजी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे (ईपीएफ) पैसे मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) संघटनेकडील आकडेवारीनुसार, बायजूची पालक कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडने विद्यमान कर्मचाऱ्यांचेही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसेही जमा केलेले नाहीत. कंपनीने डिसेंबर २०२२ आणि चालू वर्षातील जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ईपीएफचे पैसे १९ जूनला जमा केले आहेत. याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना नियमित वेतनही मिळालेले नाही, अशीही तक्रार आहे.