शिक्षण आणि तंत्रज्ञान कंपनी बायजूने आपल्या पुनर्रचना प्रक्रियेचा भाग म्हणून विविध विभागांमधील सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. नोकर कपात केलेले कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील आहेत.
बायजूने सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
बायजूने सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. नवीन कर्मचार्यांच्या समावेशासह कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ५०००० च्या आसपास आहे. नवीन नोकरकपात कंपनीच्या एकूण कर्मचार्यांपैकी सुमारे दोन टक्के आहे. एक अब्ज डॉलर्सच्या कर्जफेडीवरून अमेरिकेच्या न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असताना कंपनीतील टाळेबंदीला सुरुवात झाली आहे.
बायजू यांनी आधीच टाळेबंदीचे संकेत दिले होते
ऑक्टोबर २०२२ पासून पुढील सहा महिन्यांत सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू, असे संकेत बायजूने आधीच दिले होते. अलीकडील टाळेबंदी हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा: बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब; आता RBI म्हणते…
फेब्रुवारीमध्ये सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
यंदा फेब्रुवारीमध्ये बायजूने सुमारे १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यामध्ये प्रामुख्याने डिझाइन, अभियांत्रिकी आणि उत्पादन व्हर्टिकलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बायजूने सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के होते. बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते की, नियोजित २५०० कर्मचाऱ्यांच्या पलीकडे कोणतीही टाळेबंदी केली जाणार नाही. त्यानंतर आता कंपनी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, कस्टमर केअर, इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स आणि इतर क्षेत्रातील काही फंक्शन्स आउटसोर्स करण्याचा विचार करीत आहे.