नवी दिल्ली : शिकवणी मंच बैजूजची मालकी असलेल्या थिंक अँड लर्न या कंपनीच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन मोहन यांनीही आता या अडचणीत सापडलेल्या कंपनीची साथ सोडत सोमवारी राजीनामा दिला. त्यांच्या जागी आता संस्थापक बैजू रवींद्रन हे आता कंपनीचे दैनंदिन कामकाज सांभाळतील, असे स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा >>> रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रतिस्पर्धी अपग्रॅडच्या मुख्याधिकारी पद सोडत मोहन हे बैजूजमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे प्रमुख म्हणून रुजू झाले होते. नंतर, बैजूजच्या तत्कालीन मुख्याधिकारी मृणाल मोहित यांनी राजीनामा दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना भारतातील कारभाराची जबाबदारी देण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर मोहन यांनी संस्थेची पुनर्रचनेचा भाग म्हणून सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. मृणाल मोहितनंतर, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अजय गोयल यांनी कंपनीत रुजू झाल्यानंतर सहा महिन्यांत म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिला, तर कंपनी सोडून जाणाऱ्यांच्या मालिकेत अर्जुन मोहन हे तिसरे उच्चाधिकारी आहेत. कर्जदाते आणि गुंतवणूकदारांसोबत विविध न्यायालयात सुरू असलेले कज्जे, प्रचंड आर्थिक चणचण जाणवत असलेल्या बायजूला कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देणेही आव्हानात्मक बनले आहे. नव्याने उभारलेला २० कोटी अमेरिकी डॉलरचा निधीच्या वापराला न्यायालयात आव्हान दिले गेले असून, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणापुढे (एनसीएलटी) त्या संबंधाने पुढील सुनावणी येत्या २३ एप्रिलला आहे.