Byju Salary Crisis: देशातील आघाडीची एडटेक कंपनी बायजू आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंपनी आपल्या कर्मचार्यांना पगार देखील वितरित करू शकत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. मात्र, या संकटातून कंपनीला बाहेर काढण्यासाठी बायजूच्या संस्थापकाने भावनिक पावले उचलत स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून पैसे गोळा केले आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कंपनीतील सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला.
दोन घरे आणि एक व्हिला गहाण
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे संस्थापक रवींद्रन बायजू यांनी त्यांची दोन घरे आणि बंगळुरूमधील एक बांधकामाधीन व्हिला गहाण ठेवून १२ मिलियन डॉलर्सची रक्कम जमा केली आहे. हा पैसा पगार वाटपासाठी वापरला जात होता. रवींद्रन यांनी केवळ स्वतःचे घरच नाही, तर कुटुंबातील सदस्यांच्या मालकीची घरेही गहाण ठेवली आहेत. शिक्षण क्षेत्रातील दिग्गज बायजू सध्या रोखीच्या तीव्र टंचाईला तोंड देत आहे.
कंपनीने अद्यापही मौन पाळले
मात्र, कंपनी किंवा रवींद्रन यांच्या कार्यालयाने याबाबत अद्याप उघडपणे काहीही सांगितलेले नाही. सोमवारी स्टार्टअपने हे पैसे बायजूच्या मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडकडे सुपूर्द केले, जेणेकरून कर्मचाऱ्यांना पगार वितरित करता येईल. रवींद्रन कंपनीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
कंपनी रोखीच्या तुटवड्याशी झुंजत आहे
एकेकाळी बायजूचे वर्णन भारतातील सर्वात मौल्यवान टेक स्टार्टअप म्हणून केले जात होते. रोखीच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी कंपनीने आपले यूएस आधारित डिजिटल वाचन प्लॅटफॉर्म ४०० दशलक्ष डॉलरमध्ये विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बायजू त्याच्या १.२ अब्ज डॉलरच्या मुदतीच्या कर्जाची ईएमआय परतफेड करू शकले नाही, तेव्हा संकट सुरू झाले.
रवींद्रन यांची संपत्ती ५ अब्ज डॉलर्स होती
रवींद्रन यांची संपत्ती अंदाजे ५ अब्ज डॉलर इतकी होती. वैयक्तिक पातळीवर ४०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. यासाठी त्यांनी कंपनीतील आपले सर्व शेअर्स पणाला लावले आहेत. याशिवाय बुडणाऱ्या कंपनीला वाचवण्यासाठी त्याने सुमारे ८०० दशलक्ष डॉलर्स परत गुंतवले आहेत. यामुळे त्यांच्याकडे आता रोख रक्कम उरलेली नाही.
बीसीसीआयनेही बायजूला न्यायालयात खेचले
बायजू भारतीय क्रिकेट संघाच्या वाढीच्या काळात त्याचे प्रायोजक बनले होते. मात्र, नंतर त्याने टीम इंडियाच्या जर्सीमधून आपले नाव काढून टाकले. सध्या BCCI आणि BYJU’s कायदेशीर वादात अडकले आहेत. या प्रकरणाची सुनावणी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (NCLT) सुरू आहे.