Subhash Runwal Success Story : मायानगरी मुंबईत पैसा आणि संधींची काही कमतरता नाही. या शहराने अनेकांचे नशीब बदलले. जे थोडे पैसे घेऊन मुंबईत आले त्यांना बिझनेसमनपासून ते अभिनेत्यापर्यंतचा प्रवास गाठता आलाय, तर त्यातील काही जण आज मुंबई या शहराची आणि संपूर्ण देशाची शान बनले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत, ज्याने खिशात १०० रुपये घेऊन मुंबई गाठली, पण आज तो कोट्यवधींचा मालक बनला आहे. विशेष म्हणजे हा प्रसिद्ध उद्योगपती बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा शेजारीसुद्धा आहे. मुंबईत राहणारे सुभाष रुणवाल हे अब्जाधीश उद्योगपती आहेत आणि त्यांच्या शेजारी असलेल्या शाहरुख खान याच्यापेक्षा ते कितीतरी पटीने श्रीमंत आहेत. चला तर मग या उद्योगपतीच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत सुभाष रुणवाल?

८० वर्षीय सुभाष रुणवाल हे मुंबईतील आघाडीच्या विकासकांपैकी एक आहेत. ते रुणवाल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी लक्झरी अपार्टमेंट्स आणि शॉपिंग मॉल्समध्ये परवडेल, असे उत्पादन करते. सुभाष रुणवाल यांची कथा महाराष्ट्रातील धुलिया या छोट्याशा गावातून सुरू होते. जिथे त्यांचे बालपण गरिबीत गेले आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, पुण्यात शिक्षण घेऊन बीकॉमची पदवी पूर्ण केल्यानंतर रुणवाल वयाच्या २१ व्या वर्षी अकाउंटंट होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला आले. १९६४ मध्ये जेव्हा ते मुंबईत पोहोचले, तेव्हा त्यांच्या खिशात फक्त १०० रुपये होते. आपल्या कर्तृत्वाने ते सीए झाले आणि एका कंपनीत काम करू लागले. १९६७ मध्ये त्यांना अमेरिकेतील कंपनीत भरघोस पगारावर मोठी पोस्टिंग मिळाली, परंतु तेथील जीवनशैलीशी जुळवून घेता न आल्यानं ते भारतात परतले.

हेही वाचाः Money Mantra : अवघ्या २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण, कसा घेता येणार ‘या’ सरकारी योजनेचा लाभ?

रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे नाव कमावले

यानंतर त्यांनी केमिकल कंपनीत काम केले, पण १९७८ मध्ये त्यांनी स्वतःचा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली. त्यांची पहिली मालमत्ता ठाण्यात २२ एकर होती आणि त्याच शहरातील किर्तीकर अपार्टमेंट नावाची १०,००० चौरस फुटांची गृहनिर्माण संस्था हा त्यांचा पहिला प्रकल्प होता. लोकांना कमी किमतीत घरे देण्यासाठी ते प्रसिद्ध झाले.

हेही वाचा : Money Mantra : प्राप्तिकर रिटर्न वेळेवर भरता आला नाही; किती नुकसान होणार? आता उपाय काय?

भाड्याच्या खोलीतून शाहरुख खानचे शेजारी झाले

हळूहळू सुभाष रुणवाल यांचा रिअल इस्टेट व्यवसाय मजबूत होत गेला. २००२ मध्ये रुणवाल ग्रुपने मुंबईतील मुलुंड पहिला आर मॉल उघडला. सिंगापूरच्या सरकारी कंपनीच्या गुंतवणुकीतून त्यांनी घाटकोपरमध्ये १.२ दशलक्ष चौरस फुटाचा आरसीसिटी मॉल बांधला. जेव्हा त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा रुणवाल मुंबईतील कुर्ला भागात भाड्याच्या “वन रूम-किचन” मध्ये राहत होते. त्यानंतर ते घाटकोपरमध्ये दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते, मात्र आज सुभाष रुणवाल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत या बंगल्याशेजारी आलिशान घरात राहतात. सुभाष रुणवाल यांची एकूण मालमत्ता ११,५०० कोटी (१.४ अब्ज डॉलर) पेक्षा जास्त आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Came to mumbai with 100 rupees and became shahrukh khan neighbor today this is not a star but a common man story who is subhash runwal vrd