मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अखत्यारीत असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने ५० वर्षे जुना असलेली प्रतिष्ठित शीतपेय नाममुद्रा कॅम्पा ताब्यात घेतल्यांनंतर कॅम्पा नाममुद्रेअंतर्गत शीतपेय बाजारात नव्याने आगमन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान वर्षात जानेवारीमध्ये, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने गुजरातमधील शीतपेय आणि फळांचा रस तयार करणारी कंपनी सोस्यो हजूरी बीव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५० टक्के हिस्सा खरेदी केला. तर त्याआधी प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून त्यांनी सुमारे २२ कोटी रुपयांना कॅम्पा नाममुद्रेचे अधिग्रहण केले. आता रिलायन्सने कॅम्पा शीतपेय नव्याने बाजारात सादर केले आहे.

कॅम्पा-कोला ही १९७० आणि १९८०च्या दशकातील एक लोकप्रिय शीतपेय नाममुद्रा होती. मात्र कोका-कोला आणि पेप्सिकोच्या बाजारातील प्रवेशामुळे आणि स्पर्धेमुळे तो मागे पडला. १९४९ ते १९७० च्या दशकात प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता. त्याने १९७० च्या दशकात स्वतःची नाममुद्रा कॅम्पा सादर केली आणि लवकरच सॉफ्ट ड्रिंक्स विभागातील अग्रेसर बनला. नंतर, कॅम्पा ऑरेंज पेय सादर केले. मुंबई आणि दिल्ली येथे दोन प्रकल्प असलेल्या या कंपनीने ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ या घोषवाक्यांसह शीतपेये विकली, मात्र १९९० च्या दशकात अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर व्यवसायात घसरण झाली.  कॅम्पासोबत “द ग्रेट इंडियन टेस्ट” परत आणत आहे, असे रिलायन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनी कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज या तीन प्रकारात शीतपेय नव्याने सादर करणार आहे. २००, ५००आणि ६०० मिलीबरोबर, कंपनी १ आणि २ लिटरच्या घरगुती पॅकमध्ये कॅम्पा उपबंध करून देणार आहे.

जिओ प्लॅटफॉर्मकडून मिमोसा नेटवर्कचे अधिग्रहण

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्मने दूरसंचार उपकरणे बनवणारी अमेरिकी कंपनी मिमोसा नेटवर्कचे सुमारे ४५० कोटी रुपयांना अधिग्रहण केले आहे. यामुळे जिओच्या ५जी आणि ब्रॉडबँड सेवांना अधिक बळकटी मिळणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campa cola from reliance is back in market mukesh ambani reliance consumer products limited ysh