नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली कॅनरा बँकेने समभाग विभागणी योजनेसाठी १५ मे ही ‘रेकॉर्ड तारीख’ घोषित केली आहे. याचा अर्थ त्या तारखेला अथवा त्याआधी कॅनरा बँकेचे भागधारक म्हणून नोंद असलेल्यांना या योजनेसाठी पात्र मानले जाईल. भांडवली बाजारात कॅनरा बँकेच्या समभागांमध्ये तरलता सुधारण्याच्या उद्देशाने समभाग विभागणी केली जात आहे.
हेही वाचा >>> तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
फेब्रुवारीमध्ये, बँकेच्या संचालक मंडळाने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे विद्यमान समभागांचे प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ५ समभागांमध्ये विभाजित करण्यास मान्यता दिली होती. सरकारची कॅनरा बँकेमध्ये ६२.९३ टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे आहे. मुंबई शेअर बाजारात कॅनरा बँकेचा समभाग ४.८५ रुपयांच्या घसरणीसह ५७८.७० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार, बँकेचे १.०५ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.