नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ आधारबिंदूंनी (०.०५ टक्के) वाढीची घोषणा शुक्रवारी केली. नवीन दरवाढ १२ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. यातून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पतधोरण जाहीर करत रेपो दरात कोणतीही वाढ केली नाही. मात्र पतधोरणाचा दुसऱ्याच दिवशी कॅनरा बँकेने कर्जाच्या दरात वाढ केली आहे.

हेही वाचा >>> निर्मिती उद्योगातील ‘एफडीआय’ दशकभरात ६९ टक्के वाढ

आता इतर बँकांकडून देखील कर्जाच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील कॅनरा बँकेचे व्याजदर ०.५ टक्क्यांनी वाढून ९ टक्क्यांवर नेण्यात येईल. याचप्रमाणे दोन आणि तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता अनुक्रमे ९.३० टक्के आणि ९.४० करण्यात येणार आहे. एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीचा दर ८.३५ टक्के ते ८.८० टक्क्यांदरम्यान असेल. एका दिवसासाठी तो ८.२० टक्के असेल.

Story img Loader