वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीत केलेल्या रेपो दर कपातीचा लाभ कॅनरा बँकेने तिच्या ग्राहकांपर्यंत पोहचविणारे पाऊल उचलताना, विविध कालावधीच्या निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ ते १५ आधारबिंदूंची कपात केली आहे. नव्या दराची मात्रा बँकेच्या सर्वच कर्जदारांना बुधवारपासूनच (१२ मार्च) लागू होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कमी कालावधीचे दर अपरिवर्तित राहिले असले तरी, बँकेने तिचे दोन वर्षांचे आणि तीन वर्षांचे कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. एका दिवसासाठीचा कर्ज दर ८.३५ टक्क्यांवरून ८.३० टक्के केला आहे. तर दोन वर्षांसाठीचा कर्ज दर ९.३५ टक्क्यांवरून ९.२५ टक्के आणि तीन वर्षासाठीचा कर्ज दर आता ९.३० टक्के करण्यात आला आहे. तो या आधी ९.४५ टक्के होता.