मुंबईः पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर वाढत्या तणावामुळे भांडवली बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात तीव्रपण घसरताना दिसले. तिमाही निकालातून निराशा करणाऱ्या अॅक्सिस बँकेतील विक्रीने बाजारातील नकारात्मकतेत भर घातली. नफा कमावण्याच्या नादात झालेल्या बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे दोन दिवसांत ८.८८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
जागतिक बाजारातील हिरवाई पाहता सत्राच्या सुरुवातीला साधलेल्या वाढीला मागे सारत, सेन्सेक्स दिवसअखेर ५८८.९० अंशांनी (०.७४ टक्के) घसरणीसह ७९,२१२.५३ वर स्थिरावला. दिवसाच्या मध्याला त्याची घसरण १,१९५.६२ अंशांपर्यंत विस्तारली होती. पण तेथून जवळपास ६०० अंशांची भरपाई करणारी खरेदीचे पाठबळही त्याने सत्रांतर्गत मिळविले. एनएसईचा निफ्टी निर्देशांक देखील २०७.३५ अंशांच्या (०.८६ टक्के) नुकसानीसह २४,०३९.३५ वर दिवसअखेर बंद झाला. वाढत्या भू-राजकीय तणावाची बाजारावर चिंतायुक्त परिणाम दिसून आल्याचे जाणकारांनी सांगितले.
सलग दुसऱ्या घसरणीतही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा क्रम सुरूच ठेवला ही सर्वात लक्षणीय बाब ठरली. गुरुवारच्या घसरणीतही त्यांनी ८,२५०.५३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली, असे बाजारांकडून उपलब्ध माहितीने स्पष्ट केले.
मिड-स्मॉलकॅपना फटका
माहिती-तंत्रज्ञान (आयटी) निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक शुक्रवारी घसरणीसह बंद झाले, तर नफा पदरी पाडून घेण्याच्या वृत्तीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक तुलनेने मोठी म्हणजेच अडीच टक्क्यांच्या आसपास घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांचे वाढलेले मूल्यांकन पाहता त्यांनाच विक्रीचा मोठा फटका बसला. निकाल हंगामाच्या निराशादायी सुरुवातीनंतर मधल्या व तळच्या फळीतील कंपन्यांच्या संभाव्य कमाईत घसरणी होईल अशी बाजारात चिंता वाढली आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक २.५६ टक्के, तर मिडकॅप निर्देशांक २.४४ टक्क्यांनी गडगडला.