वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
जागतिक पातळीवर व्यापार तणावासह मोठ्या भूराजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे आगामी काळात भांडवली बाजाराला आणखी धक्के बसू शकतात, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालात देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक वित्तीय स्थैर्य अहवालात हा इशारा दिला आहे. व्यापार तणावामुळे भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण होऊन वित्तीय स्थैर्य धोक्यात येण्याचा इशारा अहवालात देण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या जशास तशा आयात शुल्काच्या घोषणेसह इतर घटनांचा स्पष्ट उल्लेख या अहवालात करण्यात आलेला नाही. मात्र, संघर्ष, युद्ध, दहशतवादी हल्ले, लष्करी खर्च आणि व्यापार निर्बंध यात २०२२ पासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वित्तीय संस्थांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. भूराजकीय जोखमीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी वित्तीय संस्थांनी पुरेसे भांडवल आणि गंगाजळी त्यांच्याकडे ठेवावी. जोखीम शोधणे आणि तिचे व्यवस्थापन यासाठी वित्तीय संस्थांनी सातत्याने आपल्या चाचण्या कराव्यात, असे नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीचा हा संपूर्ण अहवाल जागतिक बँकेसोबतच्या २१ एप्रिलच्या बैठकीत जाहीर केला जाणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या घोषणेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

किमान एक टक्क्याची घसरण

युद्ध, राजनैतिक तणाव अथवा दहशतवादी हल्ले यासारख्या घटनांमुळे भांडवली बाजारात सरासरी एक टक्क्याची मासिक घसरण होते. विकसनशील बाजारपेठांमध्ये ही मासिक घसरण २.५ टक्के असते. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर २०२२ मध्ये भांडवली बाजारात मासिक ५ टक्के घसरण झाली होती. इतर भूराजकीय जोखमीच्या तुलनेत ही घसरण दुप्पट होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ट्रम्प आल्यापासून फटका

कोविड संकटावेळी २०२० वॉल स्ट्रीटवर मोठी अस्थिरता दिसून आली होती. त्या तुलनेत गेल्या आठवड्यातील जास्त अस्थिरता दिसून आली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला हाती घेतल्यापासून स्टँडर्ड अँड पुअर ५०० निर्देशांकात आतापर्यंत १० टक्के घसरण झाली आहे. याचवेळी सोन्याच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेतील ग्राहक सर्वेक्षणानुसार महागाईची १९८१ नंतरची उच्चांकी पातळी गाठण्याची भीती व्यक्त होत आहे. याचवेळी वित्तीय संस्थांकडून मंदीचे इशारे दिले जात आहेत.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ११.३० लाख कोटींची घट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अतिरिक्त व्यापार शुल्काच्या घोषणेमुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या जगभरातील गुंतवणूकदार चिंतातुर असून विद्यमान महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ११.३० लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. विद्यमान महिन्यात २ एप्रिलपासून, सेन्सेक्सने १,४६०.१८ अंश गमावले आहे. परिणामी, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल या कालावधीत ११.३० लाख कोटी रुपयांनी घसरून ४०१.६७ लाख कोटी रुपयांवर (४.६६ ट्रिलियन डॉलर) पोहोचले आहे.