नवी दिल्ली: ‘गेनबिटकॉईन’ आभासी चलनासंबंधाने (क्रिप्टो करन्सी) ६,६०० कोटींच्या घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी देशभर ६० ठिकाणी छापे टाकले. विविध राज्यांमध्ये ही कारवाई दिवसभर सुरू राहिली.
दिल्लीसह, पुणे, चंडिगड, नांदेड, कोल्हापूर, बंगळुरु येथे छापे टाकण्यात आले. या घोटाळ्यातील संशयितांशी संबंधित ठिकाणी कारवाई केल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालविल्या गेलेल्या पॉन्झी घोटाळ्याचा सूत्रधार अमित भारद्वाज (सध्या मयत) आणि त्याचा भाऊ अजय भारद्वाज असल्याची माहिती पुढे आली आहे. वेरिएबलटेक पीटीई लिमिटेड या कंपनीच्या मुखवट्याखाली २०१५ मध्ये त्यांच्या बेकायदेशीर कारवायांना सुरुवात झाली. बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीतून १८ महिन्यांत प्रति महिना दहा टक्के परताव्याचे अमिष गुंतवणुकदारांना त्यांच्याकडून दाखविण्यात आले. परदेशातील बाजारमंचावर आभासी चलनाचे व्यवहार कंपनीकडून चालविले जातात असे भासविले गेले. त्याला साखळी विपणनाची जोड देत नवीन गुंतवणूकदारांची भर घालण्यात आल्याचे सीबीआयने नमूद केले.
सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना बिटकॉइनमध्ये लाभाची रक्कम मिळाल्याने विश्वास निर्माण झाला. मात्र नंतर नवीन गुंतवणूक कमी होताच २०१७ पासून समस्या सुरू झाल्या. तोटा भरून काढण्यासाठी एमकॅप या स्वनिर्मित कूटचलनात गेनबिटकॉइनने पैसै वळविले. गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा हातखंडा म्हणून हा बनाव निर्माण करण्यात आला. गुंतवणूकदारांना त्यांची फसगत झाल्याचे आढळून आल्यानंतर या घोटाळ्यात देशभरात अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने याचा तपास सीबीआयकडे सोपविला. फसवणुकीची संपूर्ण व्याप्ती उलगडण्यासाठी आणि सर्व आरोपींची ओळख पटविण्यासह, अपहार झालेल्या निधीचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांसह संपूर्ण छडा लावण्यासाठी तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. मंगळवारच्या मोहिमेतून गुन्हेगारी स्वरूपाचे डिजिटल पुरावे, डिजिटल उपकरणे तसेच ईमेल/क्लाउडमधील पुरावे हाती लागल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा