मुंबई: भारतातील आघाडीची डिपॉझिटरी संस्था असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात सीडीएसएलकडे नोंद डिमॅट खात्यांच्या संख्येने १० कोटींचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून अलीकडच्या काही महिन्यांतील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात वैयक्तिक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.
परिणामी, डिमॅट खात्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. डिसेंबर २०२२ अखेर देशातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने (एनएसडीएलच्या खातेदारांसह) प्रथमच १३ कोटींचा टप्पा ओलांडला होता. गुंतवणुकीची प्रक्रिया कागदरहित हाताळली जाण्यासह, समभाग वा रोख्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जतनासाठी डिमॅट खाती उपयुक्त आहेत.
सीडीएसएल ही दहा कोटी सक्रिय डिमॅट खात्यांसह देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. मासिक आधारावर तिच्याकडील डिमॅटधारकांमध्ये सरासरी २० ते २५ लाखांची भर पडते.