वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात सीसीपीएने ॲपआधारित प्रवास-सुविधेच्या प्रदात्या उबर, ओलाला ग्राहकांच्या तक्रारींनंतर गुरुवारी नोटीस बजावली, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. या सेवा अँड्रॉइड फोनधारक आणि आयफोनधारकांबाबत दुजाभाव बाळगत असल्याच्या तक्रारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उबर, ओला ॲपच्या माध्यमातून प्रवासासाठी वाहन आरक्षित करतांना ग्राहकपरत्वे भाडेदरांमध्ये तफावत राखत असल्याचे निदर्शनास आले. अँड्रॉइड फोन आणि ॲपल फोनवरून एकाच गंतव्य स्थानावर जाण्यासाठी वेगवेगळे भाडे दाखविले जात त असल्याने अनेक ग्राहकांनी ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. आयफोन वापरकर्त्यांकडून अँड्रॉइड कार्यप्रणालीवर चालणाऱ्या फोन वापरणाऱ्यांपेक्षा सारख्याच गंतव्य स्थानासाठी जास्त भाडे आकारले जात असल्याच्या टीकात्मक टिप्पण्यांचा समाजमाध्यमावर भडिमार सुरू आहे. हा प्रकार अनुचित व्यापार प्रथेत मोडणारा असल्याने प्राधिकरणाने याची दखल घेत उबर, ओलाला नोटीस बजावली आहे.

हेही वाचा :Share Market Crash : चार महिन्यांतच Sensex १२ टक्क्यांनी का पडला? या कंपन्यांना बसला सर्वाधिक फटका, आयटी क्षेत्र मात्र जोमात

ॲपआधारित अन्न वितरण आणि ऑनलाइन तिकीट मंचावरील आकारल्या जाणाऱ्या भिन्न किंमत धोरणांचाही विचार करण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला देणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. ओला आणि उबरकडून यावर अद्याप कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. उबरसाठी अमेरिका आणि कॅनडाबरोबरीनेच भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तिची सॉफ्टबँक-समर्थित ओला, स्थानिक प्रतिस्पर्धी रॅपिडो तसेच ब्लूस्मार्ट यांच्याशी भारतात तीव्र स्पर्धा सुरू आहे. वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान बाजारपेठेत ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही नोटीस एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central consumer protection authority ccpa issues notice to ola uber after complaints received from the customers print eco news css