नवी दिल्ली: नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे, सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या नवउद्यमींची (स्टार्टअप) संख्या पुढील १० वर्षांत वाढून १० लाखांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-इस्रायल व्यवसाय परिषदेत बोलताना गोयल यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले, जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी नवउद्यमी परिसंस्था भारतात आहे. आपण ९ वर्षांत ४५० नोंदणीकृत नवउद्यमींवरून, आज त्यांच्या संख्येत १.५७ लाखांचा टप्पा गाठला आहे. पुढील १० वर्षांत देशातील नोंदणीकृत नवउद्यमींची संख्या १० लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. इस्रायलमधील गुंतवणूकदारांना भारतात व्यापक व्यवसाय संधी असल्याचे ते म्हणाले.

सध्या ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण १,५७,७०६ नोंदणीकृत नवउद्यमी देशात कार्यरत आहेत. ही संख्या २०१६ मध्ये ४५० होती. नाविन्यपूर्ण संशोधन आणि नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण परिसंस्था उभारण्याचे पाऊल सरकारने उचलले. सरकारने यासाठी जानेवारी २०१६ मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम सुरू केली होती. सरकारचे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या नवउद्यमींना या मोहिमेअंतर्गत नोंदणीकृत केले जाते. त्यांना कर आणि बिगरकर सवलती सरकारकडून दिल्या जातात.

महाराष्ट्र अग्रस्थानी कायम

सर्वाधिक नोंदणीकृत नवउद्यमींच्या संख्येत, महाराष्ट्र २७,९२५ नवउद्यमी उपक्रमांसह आघाडीवर असून, त्या खालोखाल कर्नाटक १६,६२४, दिल्ली १६,०८२, उत्तर प्रदेश १५,०१९, गुजरात १३,०५३ आणि तामिळनाड १०,५७७ अशी राज्यवार क्रमवारी आहे.

इस्रायलच्या गुंतवणुकीत वाढ

भारत- इस्रायलमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढत आहे. इस्रायलमधील विविध कंपन्या भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करीत असून, त्यात अपारंपरिक ऊर्जा, जल तंत्रज्ञान, संरक्षण आणि निर्मिती क्षेत्रांचा समावेश आहे. एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ दरम्यान इस्रायलमधून ३२.७ कोटी अमेरिकी डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली. याचबरोबर भारतीय कंपन्या इस्रायलमध्ये औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करीत आहेत.