पीटीआय, नवी दिल्ली
देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १७ डिसेंबरपर्यंत वार्षिक तुलनेत १६.४५ टक्क्यांनी वाढून १५.८२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. प्राप्तिकराच्या अग्रिम कराचा तिसरा हप्ता भरला गेल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. १५ डिसेंबरला या तिसऱ्या हप्त्याद्वारे अग्रिम कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ७.५६ लाख कोटी रुपये झाले आहे. यंदा वैयक्तिक प्राप्तिकराचे प्रमाण ७.९७ लाख कोटी, तर कंपन्यांकडून ७.४२ लाख कोटी रुपये भरले गेले आहेत. कंपनी करात यंदा ८.६ टक्के तर वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात २२.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर भांडवली बाजारातील रोखे उलाढाल कराच्या (एसटीटी) माध्यमातून ४०,११४ कोटी रुपयांची भर पडली आहे. ज्यात वार्षिक तुलनेत तब्बल ८५.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
हेही वाचा : परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ
या कालावधीत प्राप्तिकर विभागाने ३.३९ लाख कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) दिला असून त्यात वार्षिक ४२.४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलन, ज्यामध्ये कंपनी कर, वैयक्तिक प्राप्तिकर आणि एसटीटी यांचा समावेश आहे, ते १९.२१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, जे १ एप्रिल २०२३ ते १७ डिसेंबर २०२३ यादरम्यान झालेल्या संकलनापेक्षा २०.३२ टक्क्यांनी वाढले आहे.
हेही वाचा : राधाकिशन दमानी स्व-निर्मित उद्योजकांच्या यादीत अव्वल – हुरून इंडिया
केंद्र सरकारने विद्यमान आर्थिक वर्षासाठी २२.०७ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. मात्र संकलनात आतापर्यंतची वाढ पाहता, ते निर्धारित लक्ष्य ओलांडेल अशी अपेक्षा आहे.
रवी अगरवाल, अध्यक्ष, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी)