मुंबई: केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा उत्पादक कंपनी असलेल्या ‘एनएचपीसी’मधील आंशिक हिस्सा विक्रीची (ओएफएस) घोषणा केली असून त्याअंतर्गत ३.५ कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे. कंपनीने यासाठी प्रति समभाग ६६ रुपये किंमत निश्चित केली आहे. या आंशिक समभाग विक्रीतून केंद्र सरकारच्या तिजोरीत २,३०० कोटी रुपयांची भर पडणार आहे, अशी माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी दिली.
हेही वाचा >>> तुम्ही ‘एनएसई’मध्ये ट्रेड करता का? मग तुमचेही यात मोलाचे योगदान
किरकोळ गुंतवणूकदारांना शुक्रवारी या भागविक्रीमध्ये सहभागी होता येणार आहे. ‘एनएचपीसी’ने निश्चित केलेली विक्री किंमत ही बुधवारच्या समभागाच्या बंद बाजारभावाच्या तुलनेत ९.६६ टक्के सवलतीसह आहे. गुरुवारी ‘एनएचपीसी’च्या या ओएफएसला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद लाभला. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी गुरुवारी खुल्या राहिलेल्या या विक्रीत कंपनीच्या समभागांसाठी ६,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक बोली लावली गेली.
समभागात ३ टक्क्यांची घसरण
मुंबई शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रात झालेल्या घसरणीत, एनएचपीसीचा समभागही २.७४ टक्क्यांच्या म्हणजेच प्रत्येकी २ रुपयांच्या घसरणीसह ७१.०६ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजार भावानुसार कंपनीचे बाजारभांडवल ७१,३८० कोटी रुपये इतके आहे.