मुंबई : प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवांसाठी ‘फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर’ (एफआरपी) या प्लास्टिकपासून बनलेल्या संमिश्र सामग्रीच्या वापरास प्राधान्य दिले जाईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी प्रतिपादन केले. टिकाऊ आणि उच्च गुणवत्ता असलेल्या ‘एफआरपी’पासून बनलेल्या सुमारे १०,००० टॅक्सींची या सेवेत आवश्यकता भासेल, असेही त्यांनी सूचित केले.
वसई, कल्याण, डोंबिवली या उपनगरांसह आणि मुंबईला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी फक्त १७ मिनिटांत जोडता येईल, अशा वॉटर टॅक्सी सेवेचा प्रस्ताव गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी पुढे आणला. गडकरी यांनी मंगळवारी येथे आयोजित ११ व्या रिइन्फोर्स्ड प्लास्टिकला वाहिलेल्या ‘आयसीईआरपी २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर या योजनेचा पुनरूच्चार केला. वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करू शकणाऱ्या सेवेला साजेशा जेट्टी नवी मुंबई विमानतळानजीक उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. मुंबई आणि ठाण्याभोवतीच्या जलमार्गांचा या सेवेसाठी वापर होणार असल्याने, गंजरोधक आणि टिकाऊ कम्पोझिट प्लास्टिक सामग्रीचा वॉटर टॅक्सीसाठी वापर उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा : ‘एसबीआय निफ्टी बँक इंडेक्स फंड’ गुंतवणुकीस खुला
या परिषदेनिमित्त २१ ते २३ जानेवारी २०२५ दरम्यान मुंबईतील गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात, एफआरपी सामग्रीवर आधारीत नाविन्यपूर्ण उत्पादने व तंत्रज्ञानांचे प्रदर्शनही योजण्यात आले आहे. गडकरी म्हणाले की, एफआरपी संस्थेने कंपोझिटची गुणवत्ता टिकवून ठेवत या सामग्रीच्या संभाव्य वापराचा शोध घेतला पाहिजे. संमिश्र सामग्री आश्वासक आहे आणि प्रगत तंत्रज्ञान, स्थानिक कच्चा माल वापराने खर्चात २५ ते ३० टक्क्यांची कपात केली जाऊ शकते. एफआरपीचा उपयोग संरक्षण क्षेत्र, नौकानयन, वाहन उद्योग, पायाभूत सुविधा, बांधकाम तसेच विमानोड्डाणांतही वापर शक्य आहे. भविष्यातील ही सामग्री देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला, नवकल्पना आणि स्पर्धेला चालना देऊ शकते.