नवी दिल्ली : केंद्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) अंतर्गत कर्ज मर्यादा दुपटीने वाढवून २० लाख रुपये केल्याचे शुक्रवारी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये मांडलेल्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. ज्या उद्योजकांनी याआधी ’तरुण श्रेणी’अंतर्गत मागील कर्जाचा लाभ घेतला आणि यशस्वीपणे कर्जाची परतफेड केली त्यांच्यासाठी मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली जाईल, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून घोषित केले होते. यामुळे एकूण उद्योजकता परिसंस्थेला चालना मिळावी आणि त्यात तरुणांचा सहभाग वाढावा या उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Ratan Tata Wealth : रतन टाटांची दहा हजार कोटींची संपत्ती; लाडक्या टिटोसाठीही हिस्सा राखला

उद्योजकांना २० लाखांपर्यंतच्या मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची हमी ‘कव्हरेज क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो युनिट्स’अंतर्गत प्रदान केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजनेस सुरुवात केली. त्याअंतर्गत बिगर कंपनी (नॉन-कॉर्पोरेट), बिगर-शेती लघु/सूक्ष्म उद्योगांना कर्ज उपलब्ध करून वितरण सुरू आहे. योजनेनुसार, बँका तीन श्रेणींमध्ये सध्या कमाल १० लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज देतात. यामध्ये शिशु (५०,००० रुपयांपर्यंत), किशोर (५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत) आणि तरुण ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत) श्रेणीचा समावेश होतो. ‘तरुण श्रेणी’अंतर्गत मागील कर्जाचा लाभ घेऊन कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना आता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre doubles loan limit under pradhan mantri mudra yojana print eco news zws