UPI Payment System: बहुतांश मोबाईलधारकांकडे आता यूपीआय पेमेंटची सुविधा असून त्यांच्याकडून प्रामुख्याने याच पद्धतीने आर्थिक व्यवहारांमध्ये पैसे चुकते केले जातात. यात पेटीएम, फोन पे, जीपे, अॅमेझॉन पे असे काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कधी अचानक रोख पैसे देण्याची वेळ आली, तर अनेकांच्या खिशात सुट्टे पैसे नसणे किंवा मुळात रोख पैसेच नसणे असे प्रकार अनेकदा घडताना पाहायला मिळतात. त्यामुळे यूपीआय व्यवस्थेत होणारा कोणताही बदल हा या युजर्ससाठी महत्त्वाचा ठरतो. असाच एक महत्त्वाचा बदल १५ फेब्रुवारीपासून करण्यात आला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने केलेला हा बदल युजर्सच्या प्रत्यक्ष वापराच्या प्रक्रियेत झालेला नसून व्यवस्थेच्या तांत्रिक बाबीत करण्यात आला आहे. पण त्याचा फायदा मात्र युजर्सला थेट होणार आहे. हा बदल यूपीआय पेमेंटसंदर्भातील Chargeback अर्थात पैसे परताव्याबाबत लागू करण्यात आला आहे.
काय आहे Chargeback प्रणालीतील नवा बदल?
चार्जबॅक प्रणाली ही प्रामुख्याने पैशांच्या परताव्याशी संबंधित आहे. आपण एखाद्याला जीपे, फोन पे, पेटीएम अशा माध्यमातून पैसे पाठवल्यानंतर तांत्रिक समस्येमुळे पैसे समोरच्याला जातच नाहीत किंवा एखादी वस्तू खरेदी केली असताना पेमेंट केल्यानंतरही प्रत्यक्षात ती वस्तू डिलीव्हर झालीच नाही किंवा पेमेंट झाल्यानंतरदेखील समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत असं आपल्याबाबत अनेकदा घडतं. असं काही झालं, की अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या, दुकानदाराच्या किंवा कंपनीच्या खात्यावर जमा झालेले पैसे परत मिळण्यास बराच कालावधी जातो. नव्याने बदल करण्यात आलेली चार्जबॅक सुविधा याच ‘अडकलेल्या’ पैशांशी संबंधित आहे.
पेमेंटच्या वेळी असा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वापरकर्त्याची बँक युनिफाईड डिस्प्युट रिझोल्युशन इंटरफेस अर्थात UDIR प्रणालीच्या माध्यमातून ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्या कंपनी वा व्यक्तीच्या बँकेला या व्यवहाराची माहिती देते. तसेच, जमा झालेली रक्कम तातडीनं पुन्हा ग्राहकाच्या खात्यात जमा करावी, असं कळवते. पण बऱ्याचदा या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे चुकवलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यात परत यायलाही विलंब होतो. परिणामी ग्राहकाला आपल्याच पैशांसाठी बराच काळ वाट पाहावी लागते.
नव्या बदलामुळे झटपट मिळणार पैसे!
दरम्यान, १५ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या नव्या बदलामुळे हे पैसे ग्राहकाच्या खात्यात लवकरात लवकर जमा होण्यास मदत होणार आहे. कारण नव्या प्रणालीत ट्रान्झॅक्शन क्रेडिट कन्फर्मेशन अर्थात TCC पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बँकेकडून पैसे परत देण्याची विनंती आणि लाभार्थ्याच्या बँकेकडून त्याला परवानगी ही व्यवस्था स्वयंचलित होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्याच्या बँकेकडून पैसे परताव्यासाठी होणारा विलंब टाळता येणार आहे. परिणामी आपलेच पैसे आपल्या खात्यात परत जमा होण्यासाठी आता ग्राहकांना ताटकळत बसावं लागणार नाही.