तैवानस्थित इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीतील अग्रणी फॉक्सकॉन आणि उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदान्त समूह यांनी मागील वर्षी मोठा गाजावाजा करीत घोषित केलेला सेमीकंडक्टर चिपनिर्मितीचा संयुक्त प्रकल्पाला मूर्तरूप मिळण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. मागील काही काळात वेदान्त समूहाच्या वाढलेल्या आर्थिक अडचणी पाहता, फॉक्सकॉनने या प्रकल्पासाठी नवीन भागीदार शोधण्याचे पाऊल उचलले असून, भारतातील बड्या उद्योग समूहांशीही संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.
गुजरातमधील ढोलेरा येथे सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी वेदान्त आणि फॉक्सकॉनने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भागीदारीची घोषणा केली होती. त्यावेळी उभयतांकडून संयुक्त कंपनीची स्थापनाही झाली असून, त्यात वेदान्तचा हिस्सा ६७ टक्के निश्चित करण्यात आला होता. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदान्त समूहाच्या आर्थिक स्थैर्याबद्दल केंद्र सरकारच साशंक आहे. त्यामुळे केंद्रानेच फॉक्सकॉनला नवीन भागीदार शोधण्याची सूचना केली आहे.
तब्बल १९ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणारा हा संयुक्त प्रकल्प महाराष्ट्रात तळेगाव येथे साकारला जाणार होता. तो अकस्मात गुजरात येथे हलविण्याच्या सूचनाही केंद्राकडून देण्यात आल्या होत्या. गुजरातकडून मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प पळविला गेल्याबद्दल, नव्याने स्थापित शिंदे-फडणवीस सरकारला मोठ्या राजकीय टीकेचाही त्यावेळी सामना करावा लागला होता. प्रत्यक्षात वर्ष उलटत आले तरी प्रकल्पासंबंधाने तेथेही ठोस काही घडू शकलेले नाही.
हेही वाचाः संकटातून बाहेर पडण्यासाठी ‘बायजू’ची आता धावाधाव; गुंतवणूकदारांनाही दिले ‘हे’ आश्वासन
पर्यायी भागीदार शोधण्यासंबंधी केंद्र सरकारने सूचना केल्यानंतर फॉक्सकॉनने काही कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. संभाव्य भागीदाराच्या दृष्टिकोनातून ही चाचपणी सुरू करण्यात आल्याचे समजते. या कंपन्यांमध्ये देशातील दोन मोठ्या उद्योग समूहांचा समावेश आहे. त्यांची नावे अद्याप फॉक्सकॉनने उघड केलेली नाहीत. दरम्यान, फॉक्सकॉन आणि वेदान्त यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचेही उघड झाले आहे. केंद्र सरकारच्या सेमीकंडक्टर मोहिमेंतर्गत प्रोत्साहनपर सवलतींसाठी पुन्हा अर्ज करण्यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये मतभेद होते. संयुक्त कंपनीने यासाठी मागील वर्षी केलेला अर्ज सरकारने अद्याप मंजूर केलेला नाही.
वेदान्तकडून कर्जफेडीचे पाऊल
वेदान्त रिसोर्स लिमिटेडने ट्रॅफिगुरा आणि ग्लेनकोर या दोन कंपन्यांकडून ४५ कोटी डॉलरचा निधी उभारला आहे. या निधीतून समभाग तारण ठेऊन घेतलेल्या कर्जाची फेड वेदान्त करणार आहे. या दोन्ही कंपन्या वेदान्त रिसोर्स लिमिटेडच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. कंपनी आर्थिक अडचणीत आल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.