मुंबई : मागील काही दिवसांतील तीव्र स्वरूपाच्या तेजीमुळे, मिड कॅप ते लार्ज कॅप यामधील मूल्यांकनाचे अंतर सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले असून, येत्या काही दिवसांत या चढ्या मूल्यांकनाच्या पातळीवर मुख्य निर्देशांकांनी महत्त्वाच्या पातळ्यांवर तग धरणे आव्हानात्मक भासते, असा विश्लेषकांचे अनुमान जागतिक बाजारातील संमिश्र कल तसेच देशांतर्गत बाजारात धातू आणि बँकिंग विशेषत: सरकारी बँकांच्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीने सोमवारी सप्ताहरंभीच्या व्यवहारात मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ५२३ अंकांनी गडगडला.
हेही वाचा >>> डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.८ टक्के वाढ
सत्रारंभी वर खुला झालेला आणि ७१,७५६.५९ चा उच्चांक नोंदवलेला सेन्सेक्स दिवसाचे व्यवहार आटोपताना मात्र ७१,०७२.४९ म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत ५२३ अंश (०.७३ टक्के) घसरणीसह स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २२ समभागांना घसरणीचा फटका बसला. मुख्यत्वे रिलायन्स इंडस्ट्रीज, धातू उद्योगातील अग्रणी कंपन्या आणि बँकिंग समभागांमध्ये नफा गाठीशी बांधून घेण्यासाठी झालेल्या विक्रीने निर्देशांक ७०,९२२.५७ नीचांकी पातळीवर रोडावला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १६६.४५ अंशांनी (०.७६ टक्के) घसरून २१,६१६.०५ वर बंद झाला. या व्यापक निर्देशांकांतीलदेखील ५० पैकी ३४ घटक हे घसरणीसह बंद झाले.
सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला. प्रामुख्याने मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये विक्रीचा जोर अधिक प्रमाणात दिसून आला. इंडसइंड, कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या खासगी बँकांचे समभागही घसरले.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 12 February 2024: सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, १० ग्रॅम सोन्याचा भाव आता…
सर्वव्यापी विक्रीला जोर
सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात पाऊण टक्क्याची घसरण, तर त्याव्यतिरिक्त लार्ज कॅप समभागांमध्ये ०.९० टक्के घसरण दिसून आली. बाजाराचे व्यापक प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकात अनुक्रमे ३.१६ टक्के आणि २.६२ टक्क्यांची घसरण दिसून आली. याउलट, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र आणि नेस्ले या सेन्सेक्स समभागांनी प्रवाहाच्या विपरित खरेदीपूरक बळ मिळवल्याचे आढळून आले.
तेजीपूरक उत्साह ओसरू लागलाय…
मागील काही दिवसांतील तीव्र स्वरूपाच्या तेजीमुळे, मिड कॅप ते लार्ज कॅप यामधील मूल्यांकनाचे अंतर सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसंबंधाने मजबूत अनुमान असूनही, मध्यम काळात परिचालन नफाक्षमतेवर ताण येऊन कंपन्यांच्या मिळकत कामगिरीवर त्याचा घसरणसदृश परिणाम दिसून येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चढ्या मूल्यांकन पातळीवर व्यापक बाजाराला टिकवून ठेवणे हे आव्हानात्मक ठरेल, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख, विनोद नायर यांनी मत नोंदवले. तेजीपूरक उत्साह ओसरत असून, बाजारातील निराशावादात वाढ होत असल्याचे संकेत दैनंदिन तांत्रिक आलेखांतून दिले जात आहेत. तिमाही वित्तीय निकाल जाहीर करणाऱ्या एनएचपीसी, एसजेव्हीएन आणि भारत फोर्ज या समभागांमध्ये सोमवारी झालेली अनुक्रमे १५.८१ टक्के, २० टक्के आणि १४.०४ टक्के घसरण याच निराशेला दर्शवणारे आहे.