CNG Price Hike: महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी गाड्या खरेदी करत आहेत किंवा आपल्या गाडीत सीएनजी किट बसवत आहेत. मात्र, आता सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत असताना दिसून येत आहे.
किती वाढले दर?
वाढत्या महागाईचा दिल्लीतील जनतेला आणखी एक झटका बसला असून सीएनजीच्या किमतीत १ रुपयांनी वाढ झाली आहे. देशाची राजधानी आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून तीन आठवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. या नव्याने लागू करण्यात आलेल्या दरवाढीमुळे आता राजधानी दिल्लीत ७६.५९ प्रति किलो या दरात सीएनजी मिळत आहे. सीएनजीचे नवीन दर १४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत. नवी दरवाढ लागू झाल्याने येथील लोकांना आता सीएनजीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
(हे ही वाचा : Gold-Silver Price on 15 December 2023: सोन्याच्या किमतीत आज मोठा बदल, पाहा आजचा दर)
कोणकोणत्या शहरात वाढले दर?
दिल्ली-एनसीआरपाठोपाठ गाझियाबादमध्ये सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. तिन्ही शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती तेल विपणन कंपन्यांकडून देण्यात आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये सीएनजीची नवीन किंमत ८२.२० रुपये प्रति किलो आणि ग्रेटर नोएडामध्ये ८१.२० रुपये प्रति किलो झाली आहे. दरात प्रत्येकी १ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर गाझियाबादमध्ये सीएनजीचा नवा दर ८१.२० रुपये प्रति किलो झाला आहे आणि एनसीआरमध्ये समाविष्ट असलेल्या गुरुग्राममध्ये सीएनजी ८३.६२ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
मुंबई आणि पुण्यातील सीएनजी भाव किती?
देशाच्या राजधानी दिल्लीत सीएनजी महागला असला तरी मुंबई आणि पुण्यात सीएनजीच्या दरात कुठलाही बदल करण्यात आला नाही. मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो ७६ रुपये इतका असून पुण्यात प्रतिकिलो ८८ रुपये दराने विकला जात आहे.