Coal India Dividend Profit : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोल इंडियाने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना प्रति शेअर ४ रुपये लाभांश जाहीर केला आहे. लाभांश ही कंपनी तिच्या नफ्यातून गुंतवणूकदारांना देते. देशातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी कोल इंडियाने रविवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असता कंपनीने आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत ५,५२७.६२ कोटी रुपयांचा नफा मिळवल्याची नोंद केली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला ६,७१५ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.
कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चारही तिमाहीत २८,१२५ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो २०२१-२२ या आर्थिक वर्षातील १७,३७८ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा ६१ टक्के अधिक आहे. यापूर्वी २०१८-१९ मध्ये कंपनीला १७,४६४ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.
हेही वाचाः EPF खात्यात नामांकन भरल्यावर मिळणार हे तीन फायदे; तुमचे EPFO खाते त्वरित अपडेट करा अन्यथा…
नफ्यात घट होण्याचे कारण काय?
कंपनीचा नफा कमी होण्याचे कारण कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी केलेली तरतूद आहे. कंपनीकडून १ जुलै २०२१ पासून कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारणे प्रलंबित आहे. कामगार संघटनेसोबत वेतन करार करणे बाकी आहे. यासाठी कंपनीने ५,८७०.१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
हेही वाचाः ‘६ महिन्यांची नोटीस पूर्ण करा अन्यथा…’, नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गो फर्स्टचा दबाव
कोल इंडियाने एका वर्षात दिलेला एकूण लाभांश
आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत घोषित करण्यात आलेला ४ रुपये प्रति शेअरचा लाभांश ग्राह्य धरल्यास कंपनीने प्रति शेअर २४.२५ रुपये एकूण लाभांश दिला आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारीमध्ये प्रति शेअर ५.२५ रुपये आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रति शेअर १५ रुपये लाभांश दिला होता. सोमवारी (८ मे) सकाळी ११ वाजता कोल इंडियाचा शेअर २.७० टक्क्यांनी घसरून २३१ रुपयांवर व्यवहार करीत होता.