पीटीआय, मुंबई
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी किरकोळ महागाई दराचा ५.४ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. याचवेळी जागतिक पातळीवरील खाद्यवस्तू आणि इंधन महागाईचे चटके बसू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा निर्धार ही बँकेने केला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सूक्ष्मआर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकास यांना वाढत्या महागाई दराचा धोका आहे. जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाईचा दर कमी राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ४.६ टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत तो ७.३ टक्के होता. चालू आर्थिक वर्षात सुरूवातीच्या काळात महागाई दर कमी होता. नंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याने उसळी घेतली. खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर कमी राहील.
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा दराचा ५.४ टक्क्यांचा अंदाज जाहीर केला आहे. दुसऱ्या तिमाहीत तो ६.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ५.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.२ टक्के राहील, असा अंदाज आहे. त्यातील जोखीम संतुलित आहे. पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत महागाईचा दर ५.२ टक्के राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑगस्टच्या पतधोरणातही चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा दराचा अंदाज ५.४ टक्के वर्तविण्यात आला होता.