लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सरलेल्या २०२२-२३ आर्थिक वर्षात चलनात असणाऱ्या नोटांचे मूल्य आणि प्रमाण दोन्हींमध्ये वाढ दिसून आल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने स्पष्ट केले. चलनात असणाऱ्या नोटांचे मूल्य व प्रमाण आधीच्या वर्षातील वाढ ही अनुक्रमे ९.९ टक्के आणि ५ टक्के होती, जी मागील वर्षी ७.८ टक्के आणि ४.४ टक्के अशी होती.
रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, यंदा ३१ मार्चअखेर चलनातील एकूण नोटांच्या मूल्यात ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांचा वाटा ८७.९ टक्के होता. आधीच्या वर्षाचा विचार करता हे प्रमाण ८७.१ टक्के असे होते. एकूण चलनात पाचशेच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक ३७.९ टक्के आणि त्याखालोखाल दहा रुपयांच्या नोटांचे प्रमाण १९.२ टक्के होते. मार्च २०२३ अखेर चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या ५,१६,३३८ लाख इतकी होती आणि त्यांचे मूल्य २५ लाख ८१ हजार ६९० कोटी रुपये होते. ५००च्या नोटांची संख्या मार्च २०२२ अखेर ४,५५,४६८ लाख होती.
रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. या नोटाबदलीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, मार्च २०२३ अखेर चलनात असलेल्या २,००० च्या नोटांची संख्या ४,५५,४६८ लाख होती आणि त्यांचे मूल्य ३ लाख ६२ हजार २२० कोटी रुपये होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चअखेरीस एकूण चलनातील २,००० च्या नोटांची संख्या १.६ टक्क्यांनी कमी झाली होती. मूल्याचा विचार करता त्यात १०.८ टक्के घट झाली.
ई-रुपयाच्या वितरणात वाढ
रिझर्व्ह बँकेने ई-रुपया (सीबीडीसी) चलनात आणला. हा पथदर्शी प्रकल्प आहे. मार्चअखेरीस वितरणातील घाऊक ई-रुपयाचे मूल्य ११०.६९ कोटी रुपये आणि किरकोळ ई-रुपयाचे मूल्य ५.७० कोटी रुपये आहे.
हेही वाचा – HDFC बँकेकडून दोन विशेष FD योजना सुरू, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘इतका’ परतावा
नोटा छपाईसाठी ४,६८२ कोटींचा खर्च
रिझर्व्ह बँकेला आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नोटा छपाईसाठी एकूण ४,६८२ कोटी रुपयांचा खर्च आला. त्याआधीच्या वर्षात हा खर्च ४,९८४ कोटी रुपये होता. याचबरोबर मागील आर्थिक वर्षात दोन हजारांच्या खराब झालेल्या अथवा फाटक्या ४,८२४ लाख नोटा नष्ट करण्यात आल्या. त्याआधीच्या वर्षात अशा ३,८४७ लाख नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या.