इन्फोसिसचे संस्थापक सदस्य नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून ७० तास काम करण्याबाबतच्या वक्तव्यावरून मोठा वादंग उठला आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी नारायण मूर्ती यांच्या सल्ल्याविरुद्ध मतप्रदर्शन केलं आहे, तर अनेक बडे उद्योगपती त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांचे वक्तव्य समोर आले आहे. पै यांनीही नारायण मूर्ती यांच्या विधानाचे समर्थन केले असून, कष्टातूनच समृद्धी येते, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहनदास पै म्हणाले, कष्टानेच समृद्धी येते

मोहनदास पै यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मोहनदास पै यांनी एक डेटादेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आठवड्यातील कामाच्या तासांची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मोहनदास पै यांनी लिहिले की, ‘हा मनोरंजक डेटा आहे. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, परंतु नारायण मूर्ती यांनी दिलेला सल्ला ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांसाठी होता. समृद्धीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आकडेवारी हे दर्शवते.

मोहनदास पै यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दर आठवड्याला सरासरी ६१.६ तास काम करतात. दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीवमध्ये हा आकडा ७८.६ तासांचा आहे, जो देशातील सर्वाधिक आहे. हा डेटा भारत सरकारच्या वेळ वापर सर्वेक्षणानुसार आहे, जो भारत सरकारने २०१९ मध्ये आयोजित केला होता.

नारायण मूर्ती यांच्या सल्ल्याने सोशल मीडियात फूट पडली

प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, ‘भारत जगातील सर्वात कमी उत्पादकता असलेल्या देशांपैकी एक आहे. जोपर्यंत आपण आपल्या कामाची उत्पादकता वाढवत नाही, जोपर्यंत आपण भ्रष्टाचाराला आळा घालत नाही आणि आपल्या नोकरशाहीला निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ कमी करत नाही, तोपर्यंत आपण विकसित देशांशी स्पर्धा करू शकणार नाही. नारायण मूर्ती म्हणाले, ‘मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी देशासाठी आठवडाभर ७० तास काम करावे. जसे दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानने केले.

आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या नारायण मूर्ती यांच्या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इन्फोसिसमध्ये तरुणांना दिल्या जाणाऱ्या पगारावर यूजर्सनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय भारतातील कार्यसंस्कृतीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. बंगळुरूचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. कृष्णमूर्ती यांनी नारायण मूर्ती यांच्या विधानावर टीका केली आणि ते म्हणाले की, आठवड्यातून ७० तास काम केल्यानंतर लोकांना समाजकारण, कुटुंब आणि व्यायामासाठी वेळ मिळणार नाही. मग आपण विचारू की तरुणांना हृदयविकाराचा झटका का येतो?

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corroborating narayan murthy statement the former cfo of infosys said that advice was for young people under the age of 30 vrd
Show comments