लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: कॉसमॉस बँकेने सहा महिन्यांत, मराठा सहकारी बँकेपश्चात मुंबईतील अर्धशतकी वारसा असलेली दुसरी बँक – दि साहेबराव देशमुख सहकारी (एसडीसी) बँकेला विलीन करून घेतल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. एसडीसीच्या सर्व ११ शाखा (मुंबईतील १० व साताऱ्यातील १) मंगळवारपासून रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून सेवेत रुजू झाल्या.

कॉसमॉस बँक व साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या या ऐच्छिक विलीनीकरणामुळे त्या बँकेतील ठेवीदारांच्या १४३.४० कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण मिळाले आहे, असे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले. एसडीसी बँकेचा एकूण व्यवसाय २२७.५४ कोटी रुपये आहे. विलीनीकरणातून त्या बँकेतील लाखो ठेवीदारांच्या पैशांचे संरक्षण होण्यासह, सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन त्यांचा रोजगारही वाचवला गेला आहे. शिवाय अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेलाही यातून मंजुरी मिळू शकली, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… रोख्यांच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये ५०,००० कोटींपर्यंत निधी उभारणी शक्य

मागील १५ महिन्यांत पुण्यातील शारदा सहकारी बँक, तर मुंबईतील मराठा तसेच एसडीसी या बँकांना विलीन करून घेतल्यामुळे, कॉसमॉस बँकेच्या शाखांच्या संख्येत २६ इतकी भर पडली आहे. परिणामी कॉसमॉस बँकेच्या आता मुंबईमध्ये एकूण ५० शाखा झाल्या आहेत आणि ७ राज्यांत एकूण १७० शाखा झाल्या आहेत, असे काळे यांनी नमूद केले.

मंगळवारपासून साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या शाखा कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या. कोणत्याही शाखेत ठेवी काढण्यासाठी खातेदारांच्या रांगा लागल्याचे चित्र नव्हते. उलट अनेक ठिकाणी ठेवींचे नूतनीकरण, तर चार शाखांमध्ये नव्याने ठेवी जमा केल्या गेल्या. हे उत्साहवर्धक चित्र असून, एकंदर सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी आशावाद जागवणारे आहे. – मिलिंद काळे, अध्यक्ष कॉसमॉस बँक

Story img Loader