मुंबईः देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या कॉसमॉस बँकेने मार्च २०२५ पर्यंत, छोट्या व्यावसायिक कर्जावर भर देण्याचे आणि या क्षेत्रात २,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईतील शाखांमधून यापैकी २५ टक्क्यांहून अधिक म्हणजे जवळपास ५५० कोटी रुपयांचे योगदान येईल, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी मंगळवारी केले.
हेही वाचा >>> सवलतीच्या दरात तेल खरेदीसाठी रिलायन्सचा रशियाच्या ‘रोझनेफ्ट’शी करार
कॉसमॉस बँकेने सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात ठेव संकलन, कर्ज वितरण, कर्ज वसुली आणि नक्त अनुत्पादित मालमत्ता (नेट एनपीए) अशा आघाड्यांवर उत्तम कामगिरीसह, ३८४ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला. बँकेच्या ठेवी मार्च २०२४ अखेर २०,२१६ कोटींवर पोहोचल्या असून, कर्ज वितरण १५,१९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रिझर्व्ह बँकेच्या दंडकांप्रमाणे नागरी सहकारी बँकांच्या एकूण कर्ज वितरणांत, १ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या प्राधान्य क्षेत्रातील रिटेल कर्जाचे प्रमाण ५० टक्के असायला हवे. कॉसमॉस बँकेबाबत हे प्रमाण सध्या ४३ टक्के असून, ते मार्च २०२५ पर्यंत ५० टक्क्यांवर नेले जाईल. त्यासाठी लघुउद्योग, व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या कर्ज प्रस्तावांना प्राधान्य दिले जाईल, असे काळे यांनी स्पष्ट केले. २०२३-२४ मध्ये बँकेने एकूण व्यवसायात १५.१६ टक्क्यांची वाढ करून तो ३५,४०८ कोटी रुपयांवर नेला आहे, चालू वर्षातही व्यवसाय वाढीचा हा दर साध्य केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकेचे कर्ज-ठेव गुणोत्तर ७५ टक्के व आसपास टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> निकालाआधी नफावसुलीला प्राधान्य…; ‘सेन्सेक्स’ची २२० अंशांची पीछेहाट
नवीन बँका संपादण्याचा प्रस्ताव नाही!
सहकारी बँकिंग क्षेत्रात १९९९ पासून, तब्बल १८ आजारी सहकारी बँकांना कॉसमॉस बँकेने ताब्यात घेतले असून, सध्याच्या १७० शाखांच्या जाळ्यात ५२ टक्के अर्थात ९० शाखांची भर या संपादित बँकांमुळे होऊ शकली आहे. मागील आर्थिक वर्षात ताब्यात घेतलेल्या मराठा सहकारी बँक (७ शाखा) आणि साहेबराव देशमुख सहकारी बँक (११ शाखा) यामुळे मुंबईत सर्वाधिक ५० शाखा असणारी सहकारी बँक म्हणून कॉसमॉसला लौकिक स्थापता आला आहे. पण तूर्त नव्या कोणत्याही आजारी बँकेच्या संपादनावर सक्रियपणे विचार सुरू नसल्याचे बँकेने स्पष्ट केले.